मुंबई - नेहरूंच्या काळात 7 टक्के असलेला शिक्षणावरील निधी केंद्र सरकारने कमी करत 3 टक्क्यांवर आणला आहे. याला वाचा फुटू नये म्हणून, तसेच ही विद्यापीठे अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठांमध्ये सरकार पुरस्कृत हल्ले सुरू असल्याचा गंभीर आरोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे महेश भारतीय यांनी केला आहे. 'गेट वे ऑफ इंडिया' जवळ सुरू असलेल्या जेएनयु हल्ल्याविरोधातील आंदोलनादरम्यान ते बोलत होते.
जेएनयुमध्ये झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत ; सम्यक विद्यार्थी संघटना हेही वाचा - BREAKING NEWS : हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी; पुन्हा हल्ला करण्याची दिली धमकी
सरकारने शिक्षणाच्या अर्थसंकल्यामधील 3,500 कोटी रुपये 'एनआरसी'साठी वापरले आहेत. त्यासाठी शासकीय विद्यापीठे बंद करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे कारस्थान सुरू आहे. ही विद्यापीठे ताब्यात घेऊन अदानी आणि अंबानी यांना देण्याचा सरकारचा घाट आहे. असा आरोप भारतीय यांनी यावेळी केला. देशातील सर्वच विद्यापीठांमध्ये असे हल्ले सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू यांचे मंत्रिमंडळ पहिल्यांदा आले तेव्हा शिक्षणासाठी 7 टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती. आता मोदी सरकारच्या काळात हा निधी 3 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आता सरकार पळवाटा काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर हल्ले करून त्यांना गावाला परत पाठवण्याचे कारस्थान करत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्याान, जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार, संजय निरुपम यांनी भेट दिली. गेल्या 24 तासांपासून अधिक काळ हे आंदोलन सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.