मुंबई: गेल्या वर्षी 12 डिसेंबर ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये एकूण 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 143 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. राज्य महामार्ग पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वाधिक अपघात हे चालकाला डुलकी लागल्याने किंवा आधिक लांबचा प्रवास सलग केल्याने घडले आहेत, असे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे.
समृद्धी कॉरिडॉरवर एकूण अपघात : राज्य महामार्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम सुरू आहे. समृद्धी कॉरिडॉरवर 12 डिसेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत 358 अपघात झाले आहेत. यातील 24 अपघातांमध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 54 अपघातांमध्ये 143 जण जखमी झाले आहेत.
पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण २१ टक्के:संपूर्ण महाराष्ट्रात 2022 मध्ये रस्ते अपघातात 15 हजार 224 मृत्यू झाले आहेत. यापैकी 57 टक्के मृत्यू दुचाकी आणि तीन चाकी वाहन चालकांचे झाले आहेत. पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण 21 टक्के आहे. राज्यभरातील इतर जिल्हा मार्गांवर (ODR) सुमारे 43 टक्के अपघात झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 720 किलोमीटरच्या कॉरिडॉरपैकी 520 किलोमीटर लांबीच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.
या कारणामुळे होतात अपघात: अपघात होण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यात उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडतात. तसेच अतिवेगामुळे, प्राणी मार्गात आल्याने, तांत्रिक बिघाडामुळे, ब्रेक डाऊन झाल्याने, अशा विविध कारणांमुळे अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा -
- Accident On Samruddhi Highway समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत आज बैठक अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर होणार चर्चा
- Sambhaji Nagar News समृद्धी महामार्गामुळे शेतीचे नुकसान शेतकऱ्याने टोल नाक्यावर आडवा लावला ट्रॅक्टर
- Accident on Samriddhi Highway समृद्धी महामार्गावर भीषण अपघात एक ठार 20 ते 23 प्रवासी जखमी