मुंबई: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि वाद हे समीकरण झाले आहे. भिडेंनी काही विधान करावे आणि ते वादात अडकू नये, असे क्वचितच घडले असेल. भिडेंनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली असून ते अनेकदा टीकेचे धनी बनले आहेत. आता दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. हा वाद शमण्याआधीच महात्मा ज्योतिबा फुले, राजा राममोहन रॉय आणि साईबाबांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे भिडे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यापूर्वीही संभाजी भिडेंनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. भिडे यांनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त विधाने कोणती, याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
आधी टिकली लाव: 2022 मध्ये एका महिला पत्रकार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्यांनी तू आधी टिकली लाव, मग तुझ्याशी बोलेन, असे म्हणत त्यांनी त्या पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. भिडेंच्या या विधानाने महिलेचा अपमान असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती.
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान: आपल्या देशाच्या स्वाभिमानाची चर्चा आपण सर्वत्र करत असतो. ज्या देशाचा गाजावाजा अख्या जगात होत आहे. त्याच भारत देशाला संभाजी भिडेंनी 'निर्लज्ज लोकांचा देश' म्हटले होते. परकीयांचे खरकटं आणि उष्ट खाणारे. स्वाभिमानाची शून्य जाणीव असलेला निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान. भारतातील लोकांना गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा विषमपणा वाटत नाही. लाजही वाटत नाही. अशा बेशरम लोकांचा भारत देश आहे, असे भिडे म्हणाले होते.
स्वातंत्र्यदिनाबाबत वादग्रस्त विधान: देशाच्या स्वातंत्र्याविषयीही भिडेंनी वादग्रस्त विधान केले आहे. 15 ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट यादिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा, असे भिडेंनी म्हटले होते.
गां* वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग: 'कोरोना' या रोगाने जगभरात थैमान घातले होते. या रोगाने लाखो नागरिकांचा जीव घेतला होता. त्यावेळीही संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोनामुळे जे माणसे मरतात, ते जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकत आहे त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चालू आहे? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे. तसेच कोरोना हा रोगच नाही. हा गां*** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग असल्याचे भिडे म्हणाले होते.