मुंबई- भाजपबरोबर गेलेले नितीशकुमार हे पुन्हा लालू यादव यांच्या बरोबर महाआघाडीत येऊ इच्छित होते. नितीशकुमार यांचे सांगणे असे होते की, त्यांना स्वतःला महागठबंधनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे. नितीशकुमार यांचा ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून असाही संदेश होता की, ते 2020 सालात लालूपुत्र तेजस्वी यास बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छितात. याबाबत चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर हे लालू यादवांना पाचवेळा भेटले. असा गौप्यस्फोट राबडीदेवी यांनी केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी राबडीदेवी काय बोलल्या याकडेही दुर्लक्ष केले असावे हे आम्ही मानतो, पण सतरंजीखाली काहीतरी रोमांचक हालचाली सुरू असल्याचे पक्षाचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे.
लोकशाहीत प्रत्येकालाच काही ना काही तरी व्हायचे आहे. त्यासाठी संधी व अस्थिरतेची वाट पाहणारे आजही आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रालोआ’स बहुमत मिळू नये व त्या परिस्थितीत नवी खिचडी पकवावी, संसद त्रिशंकू राहावी म्हणजे आपलेच घोडे पुढे दामटवता येईल. त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. नितीशकुमार हे ‘सेक्युलर’ असल्यामुळे त्यांनी पाण्यात देव घातले नसतील, असे मत व्यक्त करत बिहारच्या राजकारणात काही तर शिजत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
लालू यादव यांच्या पत्नी श्रीमती राबडीदेवी यासुद्धा एखाद्या वक्तव्याने सनसनाटी निर्माण करू शकतात हे राजकारणातील आश्चर्यच मानावे लागेल. राबडीदेवी या बिहारच्या माजी मुख्यमंत्री म्हणून कुणालाच आठवत नाहीत. तेव्हा आणि आजही त्या फक्त लालू यादवांची ‘चूल व मूल सांभाळणाऱ्या पत्नी’ म्हणूनच परिचित असल्याचा खोचक टोलाही लगवला आहे.
राबडी व लालू हे एक आदर्श जोडपे असून त्यांना एकंदरीत ९ मुलं आहेत. ‘हम दो हमारे नऊ’ इतकी भारी कामगिरी असूनही या जोडप्याने आदर्श संसार केला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राबडीदेवी यांची राजभवनातील विशेष वहीत सही करण्याची मारामार होती, पण लालूंना तुरुंगात जायचे होते. त्यामुळे आपल्या खुर्चीवर त्यांनी राबडीदेवी यांना विराजमान केले असल्याची टीका केली.