मुंबई -लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे तब्बल ७-८ महिने बंद होती. ती आता सुरु करण्यात आली आहेत. परंतु म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षककांकडून मिळत नसल्याने मोठे सिनेमे प्रदर्शित होत नाही आहे. यामुळे सिनेमागृह मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर थिएटर एक्झिबिटर असोसिएशनने काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याचा त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’ चित्रपटगृहांतच प्रदर्शित करावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला मान देत ‘राधे’ चित्रपट चित्रपटगृहांतच प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे.
थिएटरमध्ये जाऊन ‘राधे’ चा आनंद घ्यावा -
त्याच अनुषंगाने स्वतः सलमान खानने आपल्या समाज माध्यमावर एक संदेश टाकला आहे. 'मला उत्तर देण्यासाठी विलंब झाला, याबद्दल क्षमस्व. या ‘पँडेमिक’ पर्वात असा निर्णय घेणे ही मोठी गोष्ट आहे. मला कल्पना आहे की चित्रपटगृह मालक व प्रदर्शनकर्ते सध्या आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत. त्यांना माझ्याकडून मदतीचा हात पुढे करत मी, सर्वानुमते, असे सांगू इच्छितो की ‘राधे’ चित्रपटगृहांतच प्रदर्शित केला जाईल, या ईदला. परंतु मी असेही आवाहन करतो की थिएटर मालकांनी चित्रपटगृहात ‘राधे’ बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची योग्य काळजी घ्यावी व सरकारच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही व सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे, इन्शाल्लाह, ‘राधे’ २०२१ मधील ईदच्या दिवशी प्रदर्शित होईल. सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन ‘राधे’ चा आनंद घ्यावा.', असे त्याने म्हटले आहे.