मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यात भेट झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू होती. यासंदर्भात स्वत: संजय राऊत यांनी खुलासा केला असून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांनी 'हमारी अफवाह के धुंए वही से उठते है, जॅंहा हमारे नामसे आग लग जाती है', अशी शायरी लिहिलेला एक फोटो ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
'ही महाराष्ट्राची परंपरा आहे' -
आशिष शेलारांसोबतच्या भेटीसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी 'आमच्यामध्ये कोणतीही भेट झाली नसून काही दिवसांपूर्वी आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो होतो. पण ती उघडपणे झालेली भेट होती. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असे म्हटले. तसेच आमच्या भेटीच्या फक्त अफवा असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. पण जेवढ्या तुम्ही अफवा पसरवाल तेवढे अधिक आम्ही एकत्र येऊ, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आज अचानक संजय राऊत आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
हेही वाचा -संतापजनक! फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोन मुलींना बेदम मारहाण, पाहा VIDEO