मुंबई- भोपाळ लोकसभा मतदार संघाची भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग हिने हुतात्मा हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त टिपणी केली. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर तिने पोलीस कस्टडीत असताना लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप केला होता. मात्र, साध्वीने केलेले आरोप मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्य न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. याबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या चौकशी समिती अहवालात साध्वीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग हिला २००८ साली मालेगाव बॉम्ब ब्लास्टप्रकरणी अटक करण्यात आली. २००८ ते २०१७ अशी तब्बल ९ वर्षे साध्वी कारागृहात होती. या दरम्यान, चौकशीत पुरुष पोलिसांकडून तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोप साध्वीने केला. मात्र, साध्वीच्या या आरोपानंतर पोलीस रिमांडसाठी तिला न्यायालयात हजर केले असता तिने न्यायालयाला याची तक्रार केली नाही. पोलीस चौकशी दरम्यान तिच्या वैद्यकीय चाचणीतही मारहाण, लैंगिक किंवा शारीरिक छळ झाल्याची कोणतीही बाब समोर आलेली नव्हती.