मुंबई Lok Sabha Election २०२४ :आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महायुतीनं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचं रणशिंगच फुंकलं आहे. लोकसभेचे जागावाटप आणि आगामी रणनिती याविषयी महायुतीमध्ये सध्या दररोज चर्चा आणि बैठका सुरू आहेत. मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानुसार कोणत्या मतदार संघांमध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे आणि विद्यमान खासदार यांची काय स्थिती आहे, याबाबतचा अहवाल घेतला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातला अहवाल नकारात्मक: पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये चार मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांबाबत जनतेत रोष आणि नाराजी असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन मतदारसंघांमध्ये धैर्यशील माने आणि प्राध्यापक संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल असं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र सध्या परिस्थिती पाहता हे उमेदवार निवडून येणार नसल्यानं भारतीय जनता पक्षाने या जागांवर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडं सांगली मतदारसंघातून संजय पाटील यांच्या नावाला विरोध होत असून या ठिकाणी गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख आणि चंद्रहार पाटील यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळं संजय पाटील यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता आहे. सोलापूर मतदार संघातूनही जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या कामाबाबत पक्षातूनच नाराजी व्यक्त होत असल्यानं, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरातील मतदासंघांची तयारी पूर्ण :या संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य राहुल चिकोडे म्हणाले की, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागे संदर्भात राज्यातील महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी यासंदर्भात निर्णय घेईल. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी निवडणुकीतून मिळते. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आल्यास भाजपाचा कार्यकर्ता दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेल यात मात्र शंका नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या जागांवर आमचा दावा आहे असंही चिकोडे म्हणाले.