मुंबई -आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने १२ विधानसभा जागांची मागणी भाजपकडे केली आहे. अनेक ठिकाणी संघटना मजबूत असल्याने ही मागणी रास्त असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.
भाजपकडून मित्रपक्षांनी किती जागांची मागणी करायची, याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य मित्रपक्षांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये चर्चा करून जागा ठरवण्यात येणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे देण्यात येणार असून, त्यानंतर मित्रपक्षांच्या जागांचा निर्णय होणार असल्याचे खोत म्हणाले.
सदाभाऊ खोतांची विधानसेसाभाठी भाजपकडे १२ जागांची मागणी
विधानसभेच्या जागावाटपात न्याय मिळेल
लोकसभेत प्रामाणिक काम केल्याने चांगला निकाल लागला आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात निश्चित न्याय मिळेल. रयत क्रांतीने मागणी केलेल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या आहेत. या ठिकाणी ९० टक्के जागांवर भाजप-सेनेचे आमदार नाहीत. त्यामुळे जागवाटपात आम्ही उमेदरावारांसह यादी देऊ, सबळ उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असे सदाभाऊ खोत म्हणाले.
या १२ जागांची केली मागणी
इस्लामपूर, शाहूवाडी-पन्हाळा, कराड-उत्तर, माण, कोरेगाव, फलटण, नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ, नाशिकमशील सटाणा आणि विदर्भातील चिखली (बुलढाणा), मेहकर( बुलढाणा), मानखुर्द (मुंबई) अशा 12 मतदारसंघावर सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-सेना 135 जागा लढवणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर 18 जागा मित्रपक्षांना देण्याचे भाजपने याआधीच जाहीर केले आहे. भाजपबरोबर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आठवले यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे मित्रपक्ष आहेत. 18 जागांमध्ये 12 जागांची मागणी सदाभाऊ खोत यांनी केल्याने भाजपपुढे मित्रपक्षांच्या जागावाटपाची डोकेदुखी यापुढच्या काळात नक्कीच वाढणार आहे.