मुंबई : Sachin Tendulkar on on Straight Drive : मुंबईत डीपी वर्ल्ड लॉजिस्टिक्स कंपनीच्या वतीनं युवा खेळाडूंना क्रिकेटचं किट (Cricket Kits) उपलब्ध करून देण्यात आलंय. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकर यानं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय. यावेळी बोलताना सचिन तेंडुलकरने आपल्या स्ट्रेट ड्राईव्हचं (on Straight Drive) गुपित सांगितलंय.
स्ट्रेट ड्राईव्हचं सांगितलं गुपित :लहानपणी माझा स्ट्रेट ड्राईव्ह चांगला आहे, असे वरिष्ठ खेळाडू नेहमी म्हणत होते, असं सचिन तेंडुलकरनं सांगितलं. त्यासाठी नेमकं काय परिश्रम घेतले? यावर सचिन म्हणाला, यामागं केवळ माझी परिस्थिती कारणीभूत होती. मी ज्या कॉलनीत क्रिकेट खेळायचो, त्या कॉलनीमध्ये दोन्ही बाजूला इमारती होत्या आणि समोर गेट होतं. गेटला चेंडू लागला तर चौकार दिला जायचा, तसेच बाजूच्या इमारतींना पहिल्या मजल्यावर चेंडू लागला तर आउट म्हटलं जायचं. त्यामुळं चेंडू समोर मारायचा हा माझा प्रयत्न असायचा. त्यामुळं मला जास्तीत जास्त धावाही मिळायच्या आणि आऊट होण्याची भीती नसायची. हेच स्ट्रेट ड्राईव्हचं गुपित आहे.
शून्याची भीती प्रत्येक खेळाडूला : प्रत्येक खेळाडू हा शून्यावर असताना कधी एकदा पहिला रन काढतो असं त्याला वाटत असतं. कारण शून्यावर बाद होणं कोणालाही नको असतं. असा कोणताच खेळाडू नाही जो पहिल्या रनसाठी आग्रही राहणार नाही, असंही सचिन तेंडुलकर शून्य धावसंख्येची भीती वाटते का असे विचारल्यावर म्हणाला. खेळामध्ये भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असते. नॉन स्ट्रायकरला असलेल्या खेळाडूनं योग्य साथ दिली तरच धावसंख्या आकार घेते, असंही सचिन यानं यावेळी सांगितलं.