महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

योगेश सोमण यांच्यावरील कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी - सचिन सावंत - मुंबई विद्यापीठाची दुरवस्था

योगेश सोमण यांच्यावर झालेली कारवाई ही असहिष्णुता नव्हे तर शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण आहे असे खणखणीत उत्तर भाजपच्या टीकेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत

By

Published : Jan 15, 2020, 8:10 PM IST

मुंबई - भाजपच्या सत्ताकाळात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरण्यात आले होते. अननुभवी, अकार्यक्षम आणि अपात्र लोकांची केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवरती नेमणूक करुन शिक्षण व्यवस्थेचे संघीकरण करण्याचा भाजप सरकारचा डाव असतो. योगेश सोमण यांच्यावर झालेली कारवाई ही असहिष्णुता नव्हे तर शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण आहे असे खणखणीत उत्तर भाजपच्या टीकेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

सचिन सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते

सावंत म्हणाले की, योगेश सोमण ही व्यक्ती, त्यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. यांना नाट्य शास्त्र शिक्षेचा कोणताही अनुभव नाही, नाट्यशास्त्र विभागाची कोणतीही पदवी त्यांनी घेतलेली नाही. ते राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी होते, असे असतानाही काही योग्य आणि पात्र व्यक्तींना डावलून सोमण यांची मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावर बसून ते भाजप आणि संघाचा प्रचारच करत होते.

शिक्षणव्यवस्थेचे संघीकरण करण्याच्या मोठ्या कारस्थानाचा ते एक भाग होते. इतर अनेक महत्त्वाच्या पदावर नियुक्त केलेल्या संघाच्या लोकांप्रमाणेच सोमण यांचा राजकीय उपयोग भाजप करुन घेत होता. त्यांची राजकीय विधाने ही याच कार्यपद्धतीचा भाग होती. सरकारी पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने राजकीय मते मांडू नये किंवा राजकीय पक्षांशी जवळीक असू नये, असे महाराष्ट्र नागरी सेवा नियमांवलीनुसार उल्लेखित आहे. असे असतानाही बेफामपणे सोमण हे अशा पद्धतीची विधाने करु शकले याचे कारण भाजप सरकारचे त्यांना संरक्षण होते. याच कारणाने आशिष शेलारांसारखे भाजप नेते योगेश सोमण यांच्यावर झालेल्या कारवाईला असहिष्णुता म्हणून उर बडवत आहेत. खऱ्या अर्थाने एनएसयुआयने केलेले आंदोलन हे लोकशाही आणि शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी होते.

हेही वाचा -'उदयनराजेंच्या विरोधात विधान केल्यास ठोकून काढू'- मराठा क्रांती मोर्चा

सोमण यांच्यावर केलेली कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी होती, असे सावंत म्हणाले. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये संघ विचारधारेच्या अपात्र, अननुभवी, अयोग्य व्यक्तींच्या केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवर झालेल्या नियुक्त्या रद्द करून योग्य आणि पात्र व्यक्तींना त्या पदांवर नेमणे, हे शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाची दुरवस्था अशाच लोकांमुळे झालेली आहे, असेही सावंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - देशातील समुद्रावरील सर्वात लांब 'पारबंदर प्रकल्प', मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details