मुंबई-बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने स्वतः ड्रग घेत असल्याची कबुली एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती, हे विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाने कंगनाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
कंगना रणौत सारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे "झांसे के राजा' आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. इतिहासात झाशीच्या राणीचा एवढा मोठा घोर अपमान करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. त्याबद्दल भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली. कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाई केलेली नाही. ते विधान राम कदम यांचे वैयक्तिक आहे, असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. तसेच कंगनाच्या विधानाशी सहमत नसल्याची सारवासारव भाजपाने केली. पण, त्यांनी तिच्या वक्तव्यांचा साधा निषेधही केला नसल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणले.