मुंबई- बिदरमधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएए) नाटक सादर केले होते. यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्याच धर्तीवर मुंबईतील शाळकरी मुलांना सीएएच्या समर्थनासाठी वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन, आयोजक यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक ट्विट करून याविषयीची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हेही वाचा-'सीएए संदर्भात बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही'
भाजपच्या कथित देशप्रेमाचा मुखवटा गळून पडला
भाजपशासित राज्यात सीएएविरोधात बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. बिदरमध्ये चौथीच्या विद्यार्थांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, मुंबईत भाजप सीएएच्या समर्थनासाठी शाळकरी मुलांना वेठीस धरते. त्याच्यावरही त्याच न्यायाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जेएनयूमध्ये सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी पोलिसांसमोर प्राणघातक हल्ले केले त्याच्यावर कारवाई केली नाही. अतिरेक्यांची साथ देणारा पोलीस अधिकारी दविंदरसिंहला अटक होते. पण त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही. यातून भाजपच्या कथित देशप्रेमाचा मुखवटा गळून पडताना स्पष्ट दिसतो, असे सचिन सावंत म्हणाले.
संघ विचार आणि विरोधक यांच्यात सरळ भेदभाव
भाजपशासित राज्यात भाजपविरोधात बोलणाऱ्यांवर विशेषतः सीएए विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते. सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध करणाऱ्यांना भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर सरळसरळ गोळ्या घालण्याची भाषा करतात. शाहीन बागेतील सीएए विरोधक तुमच्या घरात घुसून बलात्कार करतील अशी हीन दर्जाची भाषा खासदार प्रवेश वर्मा यांनी वापरली. विरोधकांना थेट पाकिस्तानात पाठवण्याची भाषा तर सर्रास केली जाते. परंतु, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार विरोधी आवाज बंद करण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट तर थेट बदला घेण्याची धमकीच देतात. संघ विचार आणि विरोधक यांच्यात सरळ भेदभाव केला जात असल्याचे दिसत आहे. कालच शाहीन बाग मधील आंदोलकांवर गोळीबार होताना स्वस्थपणे पाहणाऱ्या पोलिसांना जामिया मिलिया विद्यापीठात आक्रमक होताना देशाने पाहिले. भाजपशासित कोणत्याच राज्यात राजधर्म पाळला जात नाही, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.