महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या तरुण तुर्कांनी आडवाणींच्या राजकीय खेळीचे स्मरण ठेवावे - उद्धव ठाकरे

भाजपच्या तरुण तुर्कांनी आडवाणींच्या चमकदार राजकीय खेळीचे स्मरण ठेवायला हवे..निवडणुकीत अडवाणीऐंवजी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आडवाणींना सक्तीची विश्रांती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजप नेत्यांना टोला

By

Published : Mar 23, 2019, 11:40 AM IST

लालकृष्ण अडवाणी उमेदवारी अर्ज भरताना - संग्रहित(सौ. सोशल मीडिया)

मुंबई- भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमदेवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या १८२ उमेदवारांच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना संधी देण्यात आलेली नाही. ते गांधीनगर मतदार संघातून खासदार होते. मात्र, या निवडणुकीत अडवाणीऐंवजी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आडवाणींना सक्तीची विश्रांती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपच्या तरुण तुर्कांनी आडवाणींच्या चमकदार राजकीय खेळीचे स्मरण ठेवायला हवे, असा टोला पक्षाचे मुखपत्र सामनामधून लगावला आहे.

ज्येष्ठ नेते आडवाणी यांनी राजकारणात मोठी उंची गाठली आहे. आडवाणी यांनी जे पेरले त्याचीच फळे आजचा भाजप खात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षातील आडवाणी युग संपले आहे. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आडवाणी ६ वेळा विजयी झाले. आता गांधीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे निवडणूक लढवतील. याचा सरळ अर्थ असा की, भीष्माचार्यांना पक्षाने सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले असल्याचा खोचक टोमनाही त्यांनी सामनातून लगावला आहे.

भाजपची स्थापना करणार्‍या मोजक्या नेत्यांत आडवाणी होते. वाजपेयी-आडवाणी या ‘राम-लखन’ जोडगोळीने पक्षाचा रथ पुढे नेला. वाजपेयी पक्षाचा चेहरा, तर आडवाणी हे सूत्रधार होते. वाजपेयींचे निधन झाले आहे व आडवाणी हे पडद्याआड गेल्याने मोदी व शहा यांनी वाजपेयी-आडवाणींची जागा घेतली हे मान्य करावे लागेल.

आडवाणी हे ९१ वर्षांचे आहेत, या वयातही ते ‘ताठ’ व कडक दिसत असले तरी हे वय निवडणूक लढण्याचे नाही. जमाना बदलला आहे व पिढीही बदलत आहे. तरुणांना संधी मिळायला हवी, असे जुनेजाणते नेते सांगतात. तेव्हा ही सुरुवात त्यांनी स्वतःपासून करायला हवी. भारतीय जनता पक्षात २०१४ सालीच खांदेपालट झाली अन् आडवाणी हे पक्षात अडगळीत गेले. पक्षात काय झाले हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येकाला कधी न कधी निवृत्त व्हावेच लागते, पण लोकांनी सक्तीने निवृत्त करण्यापेक्षा स्वतःच काळाची पावले ओळखून बाजूला होणे शहाणपणाचे ठरते. निवृत्त कधी होणार, असे विचारण्यापेक्षा निवृत्त का झालात असे लोकांनी विचारावे व त्याच वातावरणात निवृत्त व्हावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसने काहींना मृत्यूनंतरही अपमानित केले -

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चिरंजीव राहुल गांधी हे जाहीर सभांतून मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचे आदेश फाडून त्यांना अपमानित करीत होते. सीताराम केसरींचे शेवटी काय हाल झाले? तेव्हा बुजुर्गांच्या मान-सन्मानाच्या गोष्टी काँग्रेसच्या तोंडी शोभत नसल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला लगावला आहे. ळपणार्‍या प्रत्येक सूर्याला कधीतरी मावळावे लागते. आडवाणी यांनी राजकारणात मोठी उंची गाठली. अयोध्या रथयात्रेसारख्या उपक्रमांतून भाजपास शिखरावर नेले. आडवाणी यांनी जे पेरले त्याचीच फळे आजचा भाजप खात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details