महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मोदी-शहा अखंड हिंदुस्थान निर्माण करतील, पण लोकांच्या चुली विझत गेल्या तर करायचं काय' - शिवसेना सामना

भारताची अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत अडकत आहे. याकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. मोदी-शाह आपल्यातली ‘राष्ट्रवादी’ माणसे आहेत. पण हे महानुभव नवा हिंदुस्थान घडवीत असताना मागे कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारे हात दिसत नाही.

मोदी-शहा

By

Published : Sep 14, 2019, 12:06 PM IST

मुंबई - पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह हे नवा हिंदुस्थान घडविण्यात झोकून देत आहेत. देशाचा नकाशा विस्तारण्याचे त्यांनी ठरविले आहे. ते न्यूटन किंवा आइनस्टाईन, राईट बंधू नाहीत. ती आपल्यातली ‘राष्ट्रवादी’ माणसे आहेत. पण हे महानुभव नवा हिंदुस्थान घडवीत असताना मागे कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारे हात दिसत नाही. अखंड हिंदुस्थान मोदी-शाह निर्माण करतील, पण लोकांच्याच चुली विझत गेल्या तर काय करायचे? ‘हेडलाइन्स मॅनेजमेंट’वर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भाष्य समजून घेतले तर देशातील सद्य परिस्थितीची जाणीव होईल, असे म्हणत देशातील मंदीच्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपचे कान टोचले.

हेही वाचा -'बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं, पोटच्या पोरावाणी प्रेम केलं, सांगा साहेब काय मिळालं'

मनमोहन सिंग बोलू लागले आहेत हे देशासाठी शुभ संकेत मानायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण एकेकाळच्या या मौनीबाबांचे बोल सरकारला काट्यासारखे टोचत आहेत. एका महिन्यात दुसऱ्यांदा मनमोहन यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले आहे. मनमोहन यांनी आता सांगितले आहे की, ‘हेडलाइन मॅनेजमेंटमधून बाहेर पडा. अर्थव्यवस्था आणखी ढासळलीय त्याकडे लक्ष द्या.’ रियल इस्टेट असो की कृषी क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात पीछेहाट होत असल्याची माहिती मनमोहन सिंग यांनी दिली आहे. या भयंकर परिस्थितीतून लवकर बाहेर पडलो नाही तर रोजगाराच्या क्षेत्रात मोठे संकट निर्माण होईल. लोक सातत्याने बेरोजगार झाल्यास अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट निर्माण होईल, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले आहे. अनेक क्षेत्रांतून आर्थिक मंदीबाबत रोज नव्या बातम्या येत आहेत आणि चिंता वाढवीत आहेत. मनमोहन सिंग यांनी ‘हेडलाइन मॅनेजमेंट’चा उल्लेख केला व त्यांनी एका बाणात अनेक पक्षी जखमी केले आहेत. वृत्तपत्रांना देशातील परिस्थितीचे गांभीर्य असले तरी सर्व लोक सत्य परखडपणे छापत नाहीत किंवा दाखवत नाहीत. सरकारला जे हवे किंवा सोयीचे आहे त्याच बातम्या आणि मथळे देत आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा -शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा प्रश्न उफाळून आला आहे व त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उलट रोजगार व ढासळत्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवून केंद्रातले मंत्री मोदी आणि शहांच्या अडचणीत भर टाकत आहेत. अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नसते, असे दिव्य विचार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मांडले. गोयल हे काही काळ देशाचे अर्थमंत्री होते. भारतीय जनता पक्षाचे ते खजिनदारही आहेत. हे मोठे आकडे म्हणजे काय याचा खुलासा त्यांनी केला नाही. पंतप्रधान मोदी यांनी विकासकामांच्या घोषणा करताना ‘मोठ्या’ आकड्यांच्या घोषणा केल्या आहेत, पण आता राष्ट्रीय महामार्गाची कामे पुढे रेटायला सरकारकडे पैसे नाहीत असे समोर आले, पण चिंता करण्याचे कारण नाही. गोयल यांनी सांगितले आहे की, अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नाही. आइनस्टाईन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला नसता. मुळात गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला हे समजायला हवे. देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधक करीत असतात, पण जागतिक विज्ञानाचे कुळ आणि मूळ बदलून टाकण्याइतपत आमच्या मंत्र्यांनी झेप घेतली आहे. पण त्या मंत्र्यांचे हे संशोधन रोजगार गमावलेल्या लाखो लोकांना काम देईल काय? सामान्यांना मोठ्या आकड्यांच्या अर्थव्यवस्थेत अजिबात रस नाही. त्यांना त्यांची दहा-पंधरा हजारांची नोकरी गमवायची नाही. त्यावरच त्यांचा घरसंसार चालतो. याक्षणी देशात नोकरदार वर्ग, व्यापारी, शेतकरी रोजगार गमावीत आहेत व त्याच्याशी आइनस्टाईन किंवा न्यूटनचा काडीमात्र संबंध नाही. मनमोहन सिंग यांनी तेच सांगितले आहे.

हेही वाचा -विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत संभ्रम, सूत्रांची माहिती

वाहननिर्मिती क्षेत्रात मंदी आहे व अनेक उद्योग बंद पडल्याने या क्षेत्रात किमान एक कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. हा आकडा धक्कादायक आहे, पण हे सर्व ‘अरिष्ट’ आर्थिक मंदीमुळे कोसळले असे मानायला देशाच्या विद्वान अर्थमंत्री निर्मला सीतारामन तयार नाहीत. त्यांनी असा तर्क मांडला आहे की, आता धनिक लोक वाहने खरेदी करण्यापेक्षा ओला, उबेरने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे वाहनांची विक्री घटली. हा शोध न्यूटन, आइनस्टाईनपेक्षा भारी आहे. मुंबई, महाराष्ट्रात पंतप्रधानांनी ‘मेट्रो’ रेल्वेचे उद्घाटन केले. मेट्रोतून रोज साठ लाख लोक प्रवास करतील, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले. म्हणजे वाहन उद्योगाला आणखी फटका बसेल व लोकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगार व्हावे लागेल. ‘पारले जी’ बिस्किटांची विक्री घटली व त्यामुळे 10 हजार लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. याचे कारण आताची मुले बिस्किटे खात नाहीत व ही मुले तहानभूक विसरून ‘पब्जी’ खेळण्यात दंग आहेत असे द्यायचे काय? पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे नवा हिंदुस्थान घडविण्यात झोकून देत आहेत. देशाचा नकाशा विस्तारण्याचे त्यांनी ठरविले आहे. ते न्यूटन किंवा आइनस्टाईन, राईट बंधू नाहीत. ती आपल्यातली ‘राष्ट्रवादी’ माणसे आहेत. पण हे महानुभव नवा हिंदुस्थान घडवीत असताना मागे कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारे हात दिसत नाही. अखंड हिंदुस्थान मोदी-शहा निर्माण करतील, पण लोकांच्याच चुली विझत गेल्या तर काय करायचे? ‘हेडलाइन्स मॅनेजमेंट’वर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भाष्य समजून घेतले तर देशातील सद्य परिस्थितीची जाणीव होईल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details