मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळ्याआधी कोरोनाला संपवण्याचा निर्धार केला आहे. ठाकरेंचे हे विधान आशादायी असल्याचे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र येत्या 5 वर्षात उद्योग-व्यापाऱ्यात मोठी झेप घेणार असल्याचा दावा केला गेला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 35 हजार पार गेला आहे. त्यामुळे, पावसाळ्याआधी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी रेड झोनमधील निर्बंध कायम ठेवले गेले.
राज्यात उद्योगांसाठी 40 हजार एकर जमीन राखीव -
महाराष्ट्रात नवे उद्योग सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. या नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली आहे. राज्यात या उत्पादन सुरू करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
नवे उद्योजक जादूची छडी नाहीत -
नवे उद्योग लगेचच पवनगतीने काम सुरू करतील असे नाही. वीज, पाणी आणि मजुरांचा प्रश्न समोर आहेच. त्यामुळे या अडचणी उद्योगमंत्र्यांना सोडवाव्या लागतील. नवीन उद्योजक आणि सरकारकडे जादूची छडी नसल्याने या गोष्टींकरता वेळ लागणार असल्याचे सामनातून स्पष्ट केले गेले.
भाडेतत्वावरही मिळणार जमिनी -
गुंतवणूकदारांना जमिनी घेणे परवडत नसल्यास मुख्यमंत्री भाडेतत्वावर जमिनी देण्यास तयार आहेत. सोबतच तूर्तास गुंतवणूकदारांना वीज, पाणी आणि जमीन मोफत देण्यासही तयार असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे
मोदी राजवटीत उद्योग धंद्यांसाठी पोषक वाावरण नाही -
चहाच्या टपऱ्यांपासून रेस्टॉरंटपर्यंत आज सर्वकाही बंद आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आर्थिक पॅकेजमध्ये या व्यावसायांना आधार देणारे धोरण नाही. मोदी राजवटीत उद्योग धंद्यांसाठी पोषक वाावरण नाही. पैसे कमावणारा चोर किंवा डाकू असा विचार सरकारतर्फे पसरवला जात आहे. त्यामुळे, नोटबंदीसारखा दळभद्री प्रयोग करन अर्थव्यवस्थेची वाट लावली, असा आरोप सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आला आहे.