मुंबई- राज्यपाल भंगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील पत्रयुद्ध जोरदार चर्चिले जात आहे. मंदिर उघडण्यासाठी राज्यपालांनी ठाकरेंना हिंदूत्व आणि सेक्युलरवरून निशाणा साधला. त्यानंतर ठाकरे यांनी देखील खरमरीत पत्र लिहून राज्यपालांचा समाचार घेतला. त्यावरून राज्यपाल कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रातून ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! असा टोला शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या संपादकीय मधून लगावला आहे.
राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय,असा निशाणा साधत शिवसेनेने राज्यपालांच्या जबाबदारीची जाणीव कोश्यारी यांना करून दिली आहे.
कोश्यांरींना माघारी बोलावतील?
तसेच मुख्यमंत्र्यांनी मारलेला टोला पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं? अशी शक्यताही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे सामनात-
महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करत असल्याची टीका करताना त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर असल्याची टीका करत भाजप आणि राज्यपालांच्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले असल्याचा टोला लगावला आहे.
राज्यात मंदिरे उघडा यासाठी भाजपचे आंदोलन सुरू असल्याचे टायमिंग साधत माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक लोहारकी देत महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिला असल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले? मुख्य म्हणजे या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भारतीय जनता पक्षाचेही वस्त्र्ाहरण झाले, असल्याची टोलाही शिवसेनेने सामनातून लगावला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम आहे असे चार तासांपूर्वीच पंतप्रधान मोदी सांगतात व त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वा न करता भाजपवाले व त्यांचे राज्यपाल मंदिरे उघडा, गर्दी झाली तरी हरकत नाही, असा घोषा लावतात हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.
भाजपास प्रार्थना स्थळे उघडायचीच असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटायला हवे व त्याबाबत संपूर्ण देशासाठीच एक राष्ट्रीय धोरण ठरवायला हवे. तेच योग्य ठरेल. मंदिरे किंवा इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे का उघडत नाहीत? तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला आहे काय? असे प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवल्याचे दिसत नसल्याचेही अप्रत्यक्षरित्या राज्यपाल महोदयांना दाखवून दिले आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र का नाही लिहले-
राज्यपाल भगतसिंग हे सध्या गोव्याचेही राज्यपाल आहेत. गोवा ही खऱया अर्थाने देवभूमीच आहे. गोव्याचे राजकारण, अर्थकारण मंदिरे व इतर प्रार्थना स्थळांवरच सुरू असते. गोव्यातही रेस्टॉरंटस् चालू आणि मंदिरे तशी कुलूपबंदच आहेत. मग मंदिरे उघडण्यावरून महाराष्ट्र सरकारला विचारणा करणारे राज्यपाल कोश्यारी गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोच सवाल का करीत नाहीत? असा सवाल ही राज्यपाल कोश्यांरी यांना सामनातून करण्यात आला आहे.
राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांवर जबाबदारी जास्त आहे. हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्या, जेथे राजभवन आहे त्या मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणाऱया एका चवचाल नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का? असा सवालही ठाकरेंना हिंदूत्व शिकवणाऱ्या कोश्यारींना करण्यात आला आहे.