मुंबई : महायुतीत एकेकाळी घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपपासून फारकत घेण्याच्या मनस्थितीत आहे. भाजपकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रस्ताव आल्यास विचार करु, आमची पाटी कोरी आहे, असे सांगत महादेव जानकरांनी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी भाजप सत्तेसाठी केवळ वापर करतो, अशी खंत व्यक्त केली होती. आता जानकरांनी खोतांच्या सुरात सूर मिसळल्याने आगामी निवडणुकीत भाजपची मोठी कोंडी होणार आहे.
महाविकास आघाडी स्वागतच केल जाईल :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर गेल्या काही महिन्यापासून भाजपवर नाराज आहेत. शरद पवारांच्या एका कार्यक्रमांमध्ये महादेव जानकर यांनी मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार असेल तर राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या मागे ठामपणे उभा राहील, असे स्पष्ट केले होते. तेव्हाच आमच्या मनामध्ये अशा पल्लवीत झाल्या होत्या. 2014 ला राष्ट्रीय समाज पक्ष भाजपासोबत गेला. जानकर कॅबिनेट मंत्री झाले. भाजपने धनगर आरक्षणाचे आश्वासन पूर्ती केली नाही. भाजप मोठे मोठे आश्वासन देऊन घोषणा करतात, मात्र कामात शून्य आहे, हे जाणकारांच्या लक्षात आले. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी, परिवर्तन घडवण्यासाठी महादेव जाणकर महाविकास आघाडीत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशा प्रकारचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मातेले यांनी व्यक्त केले.
भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी वाट्टेल ते करू :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे भाजपवर नाराज असून काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जानकरांसारखा राजकारणातील अनुभवी माणूस सर काँग्रेसमध्ये येत असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांचे स्वागत करू. याविषयीचे बोलणे आम्ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत देखील करणार आहोत. राष्ट्रीय समाज पक्ष महाविकास आघाडीत सामील झाल्यास महाविकास आघाडीला अधिकच बळ मिळणार आहे. महाविकास आघाडीतील इतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. येणाऱ्या काळात भाजपला विरोध करणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर काढू. त्यासाठी सर्व काही करण्याची आमची तयारी असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केले आहे.
आमची पाटी कोरी आहे :मी सध्या एवढेच सांगेल की पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी संपूर्ण वेळ देणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवर कसा मोठा होईल यावर माझे लक्ष केंद्रित केले आहे. जोपर्यंत आपल्या पक्षाची ताकद वाढवत नाही, तोपर्यंत काँग्रेस किंवा भाजप विचारणार नाही, या मताचा मी आहे. त्यामुळे स्वतःची पक्षाची ताकद वाढवल्यानंतर भलेभले आपल्याला विचारायचे. राष्ट्रीय समाज पक्ष जसा जसा मोठा होईल तसे त्याचे महत्त्व वाढेल. त्यामुळे याबाबतची चिंता मला करायची नाही. महाविकास आघाडीने ऑफर दिल्यास कोणता निर्णय घेणार यावर उत्तर देताना जाणकर म्हणाले की आम्हाला जो पक्ष सन्माननीय वागणुकीने जागा देईल त्याचा विचार केला जाईल. तसेच जर यांनी नाही विचारले आणि त्यांनी विचारले तर आम्ही आमचा पर्याय खुला ठेवला आहे. आमची पाटी कोरी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी दिली आहे.