मुंबई - महायुतीमधील रिपाइंच्या वाट्याला आलेल्या जागांवरही युतीमधील इतर पक्षांनीच उमेदवार उभे केल्याने रिपाईच्या उमेदवारांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रिपाईच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमधील उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या उमेदवारांना याचा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असताना आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मात्र युतीच्या प्रचारात उपस्थित राहत असल्याचे दिसत आहे.
यामुळे महायुतीकडून भाजपा १४६, शिवसेना १२४ तर मित्रपक्षांना १८ जागा देण्यात आल्या. मित्रपक्षांना देण्यात आलेल्या १८ पैकी ६ जागा आरपीआयच्या वाट्याला आल्या होत्या. आरपीआयकडून मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना मानखुर्द शिवाजी नगर, तर उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी देण्यात आली होती. दिपक निकाळजे यांना चेंबूरमधून उमेदवारी हवी असल्याने त्यांनी फलटणमधून लढण्यास नकार दिला. तर गौतम सोनावणे यांना दिलेल्या मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी जाहीर केली. गौतम सोनावणे यांना भाजपाने एबी फॉर्म देण्यास नकार दिल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. यामुळे, आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.