मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील लोकसभेचा दक्षिण-मुंबई हा मतदारसंघ उच्चभ्रू, मध्यमवर्गीय ते झोपडपट्टीवासीय अशी मिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात देशातील अग्रणी उद्योगपतीही राहतात. दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. यावेळी हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेला लढत द्यावी लागत आहे.
मुस्लीम, जैन समाजाची मते आपल्याकडे खेचून आणण्याची स्पर्धा उमेदवारांमध्ये लागली आहेत. अमराठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराचा विजय पक्का आहे. देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व उदय कोटक यांनी पाठिंबा जाहीर केल्याने व्यापारी वर्गात तसेच गुजराती आणि मारवाडी समाजात वेगळा संदेश गेला आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी गेल्या लोकसभेत तब्बल सव्वा लाख मतांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र आता डोक्यावरून बरेच पाणी वाहून गेले असून लाट ही ओसरली आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय आता सोपा राहिला नाही, देवरांचे कडवे आव्हान आहे.
अमराठी भाषकांची निर्णायक भूमिका-
दक्षिण मुंबई मतदारसंघ हा कुलाबा, कफ परेड, वरळी ते शिवडी विधानसभा मतदारसंघात विभागाला आहे. हा मतदारसंघ बहुभाषिक आहे. दक्षिण मुंबईतून मराठी टक्का कमी झाला असून जैन, गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम मतदार या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावू शकतात. या मतदारसंघात जैन धर्मियांचे पर्युषण काळातील आंदोलन हा चर्चेचा विषय झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र तसेच मुंबईत सभा घेऊन मोदी विरोध कायम ठेवल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेनेकडून मनसेला लक्ष करण्यात येत आहे. जैन धर्मियांच्या भावना मनसेने दुखवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या मतदारसंघातील चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्टरोड, ताडदेव, कुंभारवाडा, खेतवाडी, शिवडी, वरळी ही शिवसेनेची बलस्थाने. मात्र असे असले तरी काँग्रेसने ही दोनदा हा मतदारसंघ जिंकला आहे. नागपाडा, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड इथल्या मुस्लिम बहुल भागावर देवरा यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
मागील निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव या मतदारसंघात होता. पण आता तशी परिस्थिती नाही. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. तर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या मुद्यावर सावंत यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. तसेच कोस्टल रोडच्या मुद्यावर वरळीतील कोळी समाजाच्या तीव्र नाराजीचा सामना सावंत यांना करावा लागत असल्याचे एका कोळी वाड्यातील रहिवाशाने सांगितले.