मुंबई - राज्यातील कोरोना संकट गंभीर होताना दिसत आहे. विदर्भातून सुरूवात केल्यानंतर कोरोनाने हळूहळू सर्वच शहरांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू
राज्यातील अनेक शहरामध्ये कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नाईट कर्फ्यू लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरात एका आठवड्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अमरावती, पुणे आणि औरंगाबाद शहरातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नाशिक शहरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही 15 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू तर, दिवसा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
शाळा, महाविद्यालये बंद
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता 28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहतील. 22 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जालना जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस बंद राहणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये सुरू राहणार असून, यावेळी कोरोना संदर्भातले नियम कडक करण्यात आले आहेत.
राज्यात मुंबई, पुणे आणि ठाण्यात सर्वाधिक लसीकरण
कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. शनिवार २० फेब्रुवारीपर्यंत राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे येथे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर सर्वात कमी हिंगोली, वाशीम, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद येथे लसीकरण झाले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ८ लाख ९७ हजार ४१३ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणादरम्यान कोणत्याही लाभार्थ्यांना दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात सर्वाधिक तरुण कोरोनाचे शिकार
कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना, पन्नाशी पार केलेल्या आणि सहव्याधी असलेल्यांना आहे असे सातत्याने तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. राज्यात मात्र वेगळेच चित्र आहे. कारण महाराष्ट्रात तरुण वर्ग मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण बाधितांपैकी सर्वाधिक 21.03 टक्के बाधित हे 31 ते 40 या वयोगटातील आहेत. 21 लाख 7 हजार 224 (21 फेब्रुवारीपर्यतच्या अहवालानुसार) रुग्णांपैकी 4 लाख 43 हजार 219 रुग्ण हे या गटातील आहेत. तर रुग्णांच्या आकडेवारीत तिसऱ्या क्रमांकावर 21 ते 30 हा वयोगट असून एकूण बाधितांपैकी 16.45 टक्के अर्थात 3 लाख 46 हजार 651 रुग्ण या गटातील आहेत.