मुंबई : पंधरा सदस्य हक्क भंग समितीची आज पहिली बैठक दुपारच्या सुमारास विधान भवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा केली जाईल. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर नेमकं काय वक्तव्य केलं त्याचा संदर्भ नेमका काय होता ? या सर्वांची चर्चा आज होणाऱ्या पहिल्या हक्कभंग समितीच्या बैठकीत होईल अशी माहिती हक्कभंग समितीचे सदस्य आणि भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी दिली आहे. राहूल कुल यांच्या अध्यक्षतेखाली हक्क भंग समिती स्थापन करण्यात आली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली इतर 14 सदस्यांची बैठक पार पडणार आहे.
विधिमंडळाला चोरमंडळ म्हटले : संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर विधिमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केला आहे. त्यांच्या प्रस्तावानंतर संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस काढण्यात आली. समितीची स्थापना करण्यात आली आणि आज या समितीची पहिली बैठक पार पडणार असून या बैठकीत या वक्तव्यावर सविस्तर चर्चा होईल. मात्र संजय राऊत यांनी केलेले वक्तव्यावर प्रसार माध्यमात बोलताना आपण चोरमंडळ केवळ ज्या चाळीस आमदारांनी शिवसेनेची गद्दारी केली, त्या चाळीस आमदारांना आपण चोरमंडळ म्हटले असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिले आहे.