महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईशान्य मुंबई मतदारसंघ आढावा : वाढलेल्या मतदानामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली

ईशान्य मुंबई मतदारसंघात मतदानात वाढ झाले आहे. हे वाढलेले मतदान भाजप, राष्ट्रवादीला की वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडणार, याचा नेमका फायदा कोणत्या पक्षाला याची मतदारसंघात चर्चा आहे. तर वाढलेल्या मतदानाचा फायदा आम्हालाच होईल, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपकडून करण्यात आला आहे. येत्या २३ मे ला मतमोजणी होणार असून मतदारांनी कोणाला कौल दिला, हे त्याचवेळी स्पष्ट होणार असल्याने राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघात मतदानात वाढ

By

Published : Apr 30, 2019, 7:00 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वांचे लक्ष लागून असलेला ईशान्य मुंबई मतदारसंघ निवडणुकीनंतरही चर्चेत राहिला आहे. निवडणुकीदरम्यान या मतदारसंघात मतदानात वाढ झाले आहे. या वाढलेल्या मतदानाचा नेमका फायदा कोणत्या पक्षाला होणार याची मतदारसंघात चर्चा आहे. तर वाढलेल्या मतदानाचा फायदा आम्हालाच होईल, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपकडून करण्यात आला आहे. येत्या २३ मे'ला मतमोजणी होणार असून मतदारांनी कोणाला कौल दिला हे त्याचवेळी स्पष्ट होणार असल्याने राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघात मतदानात वाढ

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान पार पडले. मुलुंड, भाडूंप, घाटकोपर अशा २० ते २२ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाला विलंब झाला. मुलंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व या मतदारसंघातील मतदारांनी भरभरून मतदान केले. या विधानसभा मतदारसंघात अनेक केंद्रावर मतदारांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. मुलुंड-घाटकोपरमध्ये गुजराती मतदार मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला मते देण्यासाठी मोठ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. मात्र, मानखुर्द शिवाजीनगरमधील मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. सन २०१४ च्या निवडणुकीतील ५२ टक्केच्या तुलनेत यावेळी या मतदार संघात ५६.१७ टक्के मतदान झाले आहे.

निवडणुकीआधी शिवसेनेचा विरोध असल्याने भाजपला या मतदारसंघातील खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी द्यावी लागली. भाजपकडून कोटक यांनी तर राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून निहारिका खोंदले यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. मतदार संघात १५ लाख ८८ हजार ३३१ मतदार असून त्यात मराठी भाषिक ७ लाख मतदार आहेत. गुजराती भाषिक १ लाख ६५ हजार, हिंदी भाषिक २ लाख ३५ हजार, मुस्लिम ३ लाख १० हजार तर इतर मतदार २ लाख ५० हजार आहेत. या मतांपैकी कोटक हे गुजराती, मराठी आणि हिंदी भाषिक मतांवर अवलंबून आहेत. पाटील हे मराठी, हिंदी भाषिक तसेच मुस्लिम मतांवर अवलंबून आहेत. तर खोंदले या दलित आणि धनगर आदी मतांवर अवलंबून आहेत. या मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना २ लाख ४० हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीने राजकीय समीकरणे बदलल्याने निहारिक खोंदले यांना किती मते मिळतात, यावर मतदारसंघाचा निकाल ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी व शाह यांच्याविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे भाजप सरकार पाडण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. यामुळे भाजप आणि मनोज कोटक यांनी गुजराती मतांवर लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा रोड शो करण्यात आला. मराठी मतांसाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा रोड शो करण्यात आला. गुजराती भाषिक, जैन, कच्छी समाजाच्या बैठका घेऊन मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार गुजराती भाषिक मतदार असलेल्या घाटकोपर आणि मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आले. मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना गुजराती भाषिक मतदार आपल्या कमळालाच मतदान करा, असे आवाहन करत होते. यामुळे मुलुंडमध्ये ६०.१० टक्के, घाटकोपर पूर्वमध्ये ६०.३० टक्के, घाटकोपर पश्चिममध्ये ५३ टक्के मतदान झाले आहे.

वाढलेल्या मताचा फायदा विरोधकांना -

मागील ५ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. लोकांमध्ये सरकार विरोधात रोष आहे. सरकार विरोधात मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संजय पाटील यांनाच होईल, असा दावा ईशान्य मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्ष मनीषा सूर्यवंशी यांनी केला आहे.

वाढलेला टक्का, काँग्रेसला धक्का -

मतदानाचा वाढलेला टक्का हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेला धक्का आहे. गेल्या वेळी मोदी लाट होती. तेव्हा ईशान्य मुंबईत ५२ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये मोदी लाट नसून त्सुनामी आहे. त्यामुळे मतदान वाढलेले आहे. वाढलेल्या मतदानामुळे मुंबईमधील सहाच्या ६ जागा सेना-भाजप महायुती जिंकेल, असा विश्वास भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details