मुंबई - पश्चिम उपनगरांतील झपाटयाने विकसित झालेला भाग अशी उत्तर पश्चिम मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गुरूदास कामत यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची तगडी फौजही २०१४ मध्ये मोदी लाटेला थोपवू शकली नाही.
शिवसेनेचे गजानन कीर्तिकर तब्बल एक लाख ८३ हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले होते. आता पुन्हा कीर्तिकरांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कीर्तीकरांसमोर आघाडीकडून काँग्रेसचे संजय निरुपम निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
पक्षिय बलाबल-
एकीकडे अंधेरी ते गोरेगाव पट्ट्यात वसलेले बंगले तर दुसरीकडे झोपडपट्टी असे या मतदारसंघातील चित्र आहे. वर्सोवा परिसरातील कोळीवाडे, अंधेरी पूर्वेकडील गावठाण परिसर, नेहमीच चर्चेत राहिलेला आरेचा हरित पट्टा ही याच भागाची ओळख. अंधेरी पूर्व-पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी आणि जोगेश्वरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. सहापैकी जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. तर गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे.
मतदारसंघातील प्रश्न-
एकीकडे अंधेरी ते जुहू दरम्यान मेट्रोला विरोध होत असून अंतर्गत मेट्रोची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. दिंडोशी ते जेव्हीएलार पर्यंतचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र, आता चित्र थोडेसे बदलले आहे. यंदा उत्तर पश्चिममधून कीर्तीकर विरोधात निरुपम यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ओशिवरा, अंधेरी लोखंडवाला परिसरात सेलिब्रिटी, उच्चभ्रू वर्ग मोठया संख्येने वसला आहे. तर गोरेगाव पूर्व पश्चिम, जोगेश्वरी, दिंडोशी परिसरात मोठ्या संख्येने मराठी मतदारही आहे.