महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईशान्य मुंबई लोकसभा: कोटक आणि पाटील यांच्यात तुल्यबळ लढत, कोण गाठणार दिल्ली ? - sanjay patil

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ मनाली जात आहे. येथून भाजपकडून मनोज कोटक हे तर राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

ईशान्य मुंबई लोकसभा

By

Published : Apr 24, 2019, 11:10 AM IST

Updated : Apr 24, 2019, 3:22 PM IST

मुंबई - मुंबईचा उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ मतदारांनी कोणत्या एका राजकीय पक्ष किंवा पुढाऱ्याची मक्तेदारी होऊ दिलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत येथील खासदार बदलत असल्याने हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला होऊ शकला नाही. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील हे मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून निहारिका खोंदले निवडणूक लढवत आहेत.


२०१४ ची परिस्थिती -

ईशान्य मुंबई हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे किरीट सोमय्या खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेचा फायदा सोमय्या यांना झाला. सोमय्या यांना ५ लाख २५ हजार २८५ मते मिळाली होती. तर संजय पाटील यांना २ लाख ८ हजार १६३, आपच्या मेधा पाटकर यांना ७६ हजार ४५१, बसपाचे मछिंद्र चाटे यांना १७ हजार ४२७ मते मिळाली होती. तर ७ हजार ११४ मतदारांनी नोटाचा वापर केला होता.

ईशान्य मुंबई लोकसभा


मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचे प्राबल्य हे या मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यासोबतच हलाकीची परिस्थिती असणाऱ्या रमाबाई नगर, कामराज नगर, पार्क साईट, मानखुर्द-गोवंडी-शिवाजी नगरसारख्या भागाचाही मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे मिनी मुंबई या मतदारसंघात पाहायला मिळते.

सोमय्यांच्या जागी कोटक -

ईशान्य मुंबईमधील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी भाजप शिवसेना युती तुटल्याचा फायदा घेत मुंबई महापालिका निवडणुकीपुर्वी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपामुळे शिवसेनेने सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला. सोमय्या यांच्या जागी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रवीण छेडा यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात एकाच पक्षाचा खासदार पुन्हा निवडून येत नसल्याने नवा चेहरा देऊन आपला खासदार पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य भेटेल. देशात मताधिक्य मिळवणाऱ्या मतदारसंघात टॉप टेनमध्ये हा मतदारसंघ असेल असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.


राष्ट्रवादीपुढे मतदारसंघ वाचवण्याचे आवाहन -

राष्ट्रवादीचे संजय पाटील हे या मतदारसंघात खासदार तर एकदा आमदार राहिले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा किरीट सोमय्या यांनी पराभव केला होता. मुंबईमधील ६ पैकी हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात येतो. यावेळेला या मतदारसंघामधील मतदारांकडून जो बदल घडेल तो बदल संजय पाटील यांच्यासाठी सकारात्मक असणार आहे. यामुळे या मतदारसंघातून निवडणून येण्यासाठी पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. पाटील यांनी यावेळी मतदारसंघात विजय न मिळवल्यास पाटील यांच्या जागी नवीन उमेदवार शोधण्याचे काम राष्ट्रवादीला करावे लागणार आहे. किंवा काँग्रेसबरोबर मतदारसंघाची अदलाबदल करावी लागणार आहे.


वंचित बहुजन आघाडी चमत्कार घडवणार -

पुण्याच्या भीमा कोरेगांव प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दलित समाज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत उभा राहिला आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात घाटकोपर, रमाबाईनगर, विक्रोळी पार्क साईट, मुलुंड, भांडुप, चेंबूर, गोवंडी मानखुर्द आदी ठिकाणी दलित मतदार मोठ्या संख्येने आहेत. या मतदारसंघातील दलित वस्त्यांमध्ये मतदारांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व दलित नेते एकत्र असताना सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांना २ लाख ४० हजार इतकी मते मिळाली होती.

पक्षीय बलाबल

या मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभेचे ६ मतदारसंघ येतात. यामध्ये ३ ठिकाणी भाजपचे २ शिवसेनेचे तर एका जागेवर समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे. तर या मतदारसंघात २३ नगरसेवक हे शिवसेना भाजपा युतीचे निवडून आले आहेत.

मुलुंड - सरदार तारासिंग (भाजप)
घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप)
घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)
विक्रोळी -–सुनील राऊत (शिवसेना)
भांडूप पश्चिम - अशोक पाटील (शिवसेना)
मानखुर्द-शिवाजीनगर - अबू आझमी (सपा)


मतदारसंघातील समस्या -

मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुलुंडपासून घाटकोपर, विद्याविहार हार्बर मार्गावरील चेंबूरपासून गोवंडी मानखुर्द आदी परिसर या मतदार संघात येतात. हा विभाग मुंबईचा डम्पिंग परिसर म्हणूनही ओळखला जातो. याच मतदारसंघात मुलुंड, कांजूरमार्ग, देवनार असे तीन मोठे डम्पिंग ग्राउंड आहेत. मुंबईतील तब्बल ९ हजार मॅट्रिक टन कचरा याठिकाणी आणून टाकला जातो. गेली काही दशके हा परिसर डम्पिंग मुक्त केला जाईल, अशी दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत.


जातीच्या, भाषेच्या मतदारांची म्हत्वाची भूमिका

या मतदारसंघात मुलुंड घाटकोपर या विधानससभा क्षेत्रात गुजारती भाषिकांची, गोवंडी मानखुर्द या विभागात मुस्लिम समाजाची तर विक्रोळी पार्क साईट घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी या विभागात दलितांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. ही सर्व मते या विभागातील खासदार निवडून देण्यात महत्वाची भूमिका बजावतात.


भाजपाची डोकेदुखी -

भाजपचा खासदार पुन्हा मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी या विभागात शिवसेनेकडून भाजपला म्हणावी तशी मदत होताना दिसत नाही. त्यातच शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अशोक पाटील यांचे संजय पाटील खासदार होतील असे विधान केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. किरीट सोमय्या यांचाही व्हिडिओ वापरून राष्ट्रवादी प्रचार करत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे दाखल झाली आहे. भाजप आणि शिवसेनेचे या मतदारसंघात मनोमिलन झाले नसल्याने, नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर दोन्ही पक्षाची बैठक घ्यावी लागली.


मतदारसंख्या

एकूण मतदार - –१५ लाख ५८ हजार ७७४
महिला मतदार -–७ लाख ०९ हजार २१७
पुरुष मतदार - – ८ लाख ४९ हजार ४३४
इतर मतदार - १२३

Last Updated : Apr 24, 2019, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details