मुंबईतील शेकडो रुग्णालयांकडे अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्रच नाही
मुंबईतही शेकडो रुग्णालये अशी आहेत ज्यांनी अग्निशमन दलाच्या नियमांची अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे या रुग्णालयांत कधीही आग लागून भंडारासारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, जी रुग्णालये अग्निशमन दलाच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी, ती बंद करण्यासाठी पालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्ष सुरक्षित
भंडाऱ्यातील गंभीर घटनेनंतर पुणे औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (SNCU) सुरक्षित असून अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी जिल्हा रुग्णालयाकडून घेतली जात आहे, अशी माहिती पुणे औंध जिल्हा रुग्णालय शल्य-चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना दिली आहे. तसेच आठवड्याला इलेक्ट्रिकची पाहणी केली जाते. दरम्यान, फायर ऑडिट करण्यात आले असून भंडाऱ्यातील गंभीर घटनेनंतर पुन्हा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भंडाऱ्यातील घटनेनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयातील 'फायर ऑडिट'चा मुद्दा ऐरणीवर
भंडाऱ्यातील घटनेनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याठिकाणी फायर ऑडिटची प्रक्रिया लालफितीत अडकली असल्याचे समोर आले आहे. महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने यासंदर्भात अग्निशमन विभागाला पत्र देण्यात आले होते. परंतु, त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही. अशा परिस्थितीत रुग्णालयात काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अग्निशमन यंत्रणेशिवाय स्त्री रुग्णालय; जालन्यातील भयावह परिस्थिती
शहरात मध्यवस्तीत दोन वर्षांपूर्वी सुसज्ज आणि देखण्या इमारतीमध्ये स्त्री रुग्णालयाचे स्थलांतर झाले. भव्य दिव्य इमारत आहे, भविष्यात कितीही अत्याधुनिक यंत्रणा आली आणि कितीही रुग्णसंख्या वाढली तरी ही इमारत सक्षम आहे. मात्र, आरोग्य प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही इमारत ताब्यात घेताना अग्निशमन यंत्रणा (फायर ऑडिट) कार्यान्वित आहे का? किंवा नाही याची पाहणी केलेली नाही. त्यामुळे आजही या स्त्री रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणांमध्ये हे एक थेंब देखील पाणी नाही, एवढेच नव्हे तर पावडरच्या सिलेंडरची देखील मुदत 26 जानेवारी 2020 ला संपणार आहे. मात्र, आजही अशा प्रकारचे सिलेंडर्स इथे लावलेले आहेत. दरम्यान, काल भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही सिलेंडरवरील स्टीकर बदलल्याचे ही आढळून आले आहे.