महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसने उमेदवारी दिलेले 'हे ' माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? - चंद्रकांत हंडोरे

अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी नुकतीच नांदेड लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता चव्हाण यांना पक्षाने विधानसभेसाठी भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही चव्हाण यांची नाकेबंदी करण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा गाठण्यासाठी चव्हाणांना मोठी लढाई लढावी लागणार आहे.

काँग्रेसने उमेदवारी दिलेले 'हे ' माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा?

By

Published : Sep 30, 2019, 10:26 AM IST

मुंबई-काँग्रेसने विधानसभेसाठीची ५१ जणांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. त्यात पाच माजी मंत्र्यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यात सुरेश वरपूडकर, डॉ. नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, म्हाडाचे माजी अध्यक्ष माणिक जगताप यांचा समावेश आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. त्यांनाही पक्षाने भोकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी नुकतीच नांदेड लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता चव्हाण यांना पक्षाने विधानसभेसाठी भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही चव्हाण यांची नाकेबंदी करण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा गाठण्यासाठी चव्हाणांना मोठी लढाई लढावी लागणार आहे.

सुरेश वरपूडकर यांना पक्षाने पाथ्री मतदारसंघातून पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवले आहे. त्यांना २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोहन फड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. फड यांना ६९ हजार मते तर वरपूडकर यांना ५५ हजार मते मिळाली होती. आता फड हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे वरपूडकरांसमोर पुन्हा विधानसभा गाठण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

डॉ. नितीन राऊत हे ही आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. उत्तर नागपूर हा विधानसभा मतदारसंघ हा राऊत यांचा बालेकिल्ला. मात्र २०१४ च्या निवडणुकीत या बालेकिल्ल्याला भाजपने सुरूंग लावला. भाजपचे मिलींद माने यांनी राऊत यांचा पराभव केला. राऊत यांना ५० हजार तर माने यांना ६८ हजार मते मिळाली होती. राऊत यांच्या विरोधात पक्षातीलच एक गट नाराज आहे. ही नाराजी दुर करून पुन्हा एकदा विधानसभेत धडकण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी दुर करण्यात राऊत यशस्वी झाल्यास पुन्हा एकदा विधानसभा गाठू शकतात. मात्र सध्या तरी त्यांच्या समोर कडवे आव्हान आहे हे नक्की.

चेंबुर मतदारसंघातून माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत हंडोरेंचा चेंबुर हा गड ढासळला होता. त्यांना शिवसेनेच्या प्रकाश फातर्फेकर यांनी पराभवाची धुळ चारली. फातर्फेकर यांना ४७ हजार तर हंडोरे यांना ३७ हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात आठवले गटाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे गेल्या वेळी मतविभाजनाचा फटका हंडोरे यांना बसला होता. यावेळीही त्यांच्या समोर निवडून येण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी झाल्याने हंडोरे यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी भाजप शिवसेना ही एकत्र लढणार आहे. त्यामुळे इथली लढतही रोमांचक असेल.

पुणे कँटोनमेंट मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवेंवर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. २०१४ च्या निवडणुकीत रमेश बागवे यांना दिलीप कांबळे यांनी पराभव केला होता. कांबळे हे फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. मात्र विस्तारात त्यांना वगळण्यात आले. त्यांचावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप लक्षवेधी होते. त्याचा फायदा बागवे कितपत उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बागवे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांच्या विरोधात पुन्हा कांबळे उतरणार का हा प्रश्न आहे. इथली लढतही जोरदार असेल. त्यामुळे बागवेंना पुन्हा विधानसभा गाठण्यासाठी जोरदार टक्कर द्यावी लागेल.

म्हाडाचे माजी अध्यक्ष माणिक जगताप यांनाही काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवाराला नाममात्र आघाडी मिळाली होती. ही जगताप यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते. शिवसेनेचे भरत गोगावले सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ते हॅट्रीक करणार की जगताप विधानसभा गाठणार या बाबत उत्सुकता आहे. मात्र या मतदारसंघातली लढत चुरशीची होईल यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details