महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव' - मंत्री बाळासाहेब थोरात

भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

By

Published : Dec 23, 2019, 7:38 PM IST

मुंबई- भाजप सरकारच्या 5 वर्षाच्या सत्ताकाळात झारखंडची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली. झारखंडमधील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने जनतेचे जीवनमान प्रचंड खालवले आहे. स्थानिक जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून राष्ट्रीय प्रश्न त्यांच्यावर थोपवण्याचे भाजपचे राजकारण झारखंडच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. कलम 370 चे भांडवल, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला आहे. भाजपच्या जनविरोधी राजकारणाचा पराभव केला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, 2017 पासून देशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही राज्यात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून तेथे भाजप आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. काँग्रेस पक्ष तेथे कधीही सत्तेत आला नाव्हता. प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर जाणार आहे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे. 2014च्या निवडणुकीत जवळपास 37 जागा जिंकून बहुमताच्या जवळपास असणाऱ्या भाजपकडे 5 वर्षांत झारखंडचा विकास करण्याची संधी होती. परंतु पाच वर्षांत भाजप सरकारने झारखंडला पिछाडीवर नेले. 2014 साली 7.32 टक्के असणारा राज्याच्या सकल उत्पन्न वाढीचा दर हा 2017पर्यंत 5.2 टक्क्यांपर्यंत घसरला. बेरोजगारीचा दर हा 15.1 टक्क्यांपर्यंत गेला. दरडोई उत्पन्नामध्ये झारखंडचा क्रमांक 28 वरून 30 वर गेला. गरिबी 8.6 टक्क्यांनी वाढली. उद्योगधंदे बुडाले नविन गुंतवणूक आली नाही. आदिवासींचे प्रश्न अधिक गंभीर झाले. शेतकरी हवालदिल झाला, भूकबळी गेले. हे अपयश झाकण्यासाठी निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राप्रमाणेच मेगाभरती हाती घेऊन विरोधी पक्षातून 11 आमदार आयात केले .पण, झारखंडच्या जनतेने भाजपच्या अनैतिक राजकारणाचा दणदणीत पराभव केला. मोदी शाह यांनी प्रत्येकी 9 सभा घेऊन राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला, तो ही सपशेल अयशस्वी ठरला आहे.

हेही वाचा - झारखंडही काँग्रेसच्या 'हातात'; मुंबई काँग्रेस कार्यालयात जल्लोष

देशपातळीवर आणखी एक राज्य भाजपच्या हातून गेल्याने काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावे लागेल. भाजपच्या जनविरोधी आणि विभाजनवादी धोरणांविरोधात देशात प्रचंड जनआक्रोश आहे. हे देशपातळीवर सुरु असलेल्या आंदोलनातून आणि आजच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये येणारे नवे सरकार गरीब, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, विद्यार्थी यांचे असेल. महाराष्ट्रातील सरकारप्रमाणे झारखंडमधील काँग्रेस आघाडीचे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, असा विश्वास करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details