मुंबई -राज्यात महाराजस्व महसूल अभियान प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना योग्य त्या सोयी सुविधा सक्षमतेने पुरवाव्यात, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (दि.1 ऑक्टो.) येथे दिले.
महसूल मंत्र्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीव्दारे सर्व सहा विभागीय आयुक्त, महसूल यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ. नितीन करीर, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सौरभ राव व आर.व्ही. गमे, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, राजीव निवतकर तसेच उपायुक्त मनोज रानडे उपस्थित होते.
आढाव्यानंतर मार्गदर्शन करताना थोरात म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीमुळे महसूल विभागाची यंत्रणा व्यस्त असल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांचे महसूलच्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. यावेळी त्यांनी महसूल विभागातील गौण खनिज, बिन शेती, ई-फेरफार, ई-ऑफिस याविषयांबाबतची प्रगती याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. महसूल विभागाच्या कामकाजात प्रशासकीय व क्षेत्रीय कामांच्या सुधारणावर भर द्यावा, असेही त्यांनी सूचित केले.
महसूल मंत्र्यांनी तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. बैठकीच्या प्रारंभी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री तसेच अन्य मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथून ही दूरदृष्य प्रणालीव्दारे परिषद पार पडली. या वेळी मंत्रालयीन उपसचिव, तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -'रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत समोर आली'