महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पालिकेचा अजब कारभार, खड्डे भरण्यासाठी प्रतिबंधित 'पेव्हर ब्लॉक'चा वापर - मुंबई

मुंबईमधील ८० टक्के खड्डे भरल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. मात्र, हे खड्डे चक्क पेव्हर ब्लॉकने भरले जात असल्याचे घाटकोपर पंतनगर येथे निदर्शनास आले आहे.

खड्डे भरण्यासाठी प्रतिबंधित 'पेव्हर ब्लॉक'चा वापर

By

Published : Jul 12, 2019, 10:02 PM IST

Updated : Jul 12, 2019, 11:56 PM IST

मुंबई - पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र, पालिकेचा हा दावा सपशेल खोटा असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने रस्तावर पडलेले खड्डे चक्क प्रतिबंधीत असलेल्या पेव्हर ब्लॉकने भरले असल्याचे मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. दरम्यान पालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. तसेच येत्या २४ तासात खड्डे बुजवले नाही, तर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खड्डे भरण्यासाठी प्रतिबंधित 'पेव्हर ब्लॉक'चा वापर

मुंबईत दरवर्षी रस्तावर खड्डे पडतात. अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होतात. त्यात अनेकांचा जीवही जातो. यामुळे दरवर्षी पालिकेवर टिका होते. पालिकेवर टिका होत असल्याने पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी हॉटमिक्स हे तंत्रज्ञान वापरले जात होते. पावसाळ्यात हॉटमिक्सने खड्डे बुजवल्यानंतर देखील पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडत आहेत. त्यामुळे पालिकेने कोल्डमिक्सचा वापर सुरू केला. कोल्डमिक्सद्वारे खड्डे चांगल्याप्रकारे बुजवले जातात, असा पालिकेचा दावा आहे. त्यासाठी पालिकेने यंदा १२०० टन कोल्डमिक्स तयार केले असून पालिकेच्या सर्व २४ वार्डमध्ये कोल्डमिक्सचे मिश्रण पाठवण्यात आले आहे. पावसाळ्यात कोल्डमिक्सद्वारेच खड्डे बुजवले जातात, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत देण्यात आली.

मुंबईमधील ८० टक्के खड्डे भरल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. मात्र, हे खड्डे चक्क पेव्हरब्लॉकने भरले जात असल्याचे घाटकोपर पंतनगर येथे निदर्शनास आले आहे. खड्डे भरण्यासाठी कोल्डमिस्क कमी पडले. त्यामुळे या खड्ड्यात पेव्हरब्लॉक बसवून त्याच्या बाजूला कोल्डमिक्स टाकल्याचे दिसत आहे. असाच प्रकार मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शनास येत असल्याने महापालिका कोल्डमिक्सने खड्डे बुजवत असल्याचा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे. पालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी पेव्हरब्लॉकने रस्ते बनवू नये. तसेच खड्डे भरण्यासाठी पेव्हरब्लॉकचा वापर करू नये, असे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर होत असल्याने मुंबईकरांच्या जिवाशी पालिका खेळात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी पालिकेने घ्यावी - रवी राजा
खड्डे बुजवण्याच्या कामाबाबत पालिकेने गंभीर व्हायला पाहिजे. पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये कोल्डमिक्स उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. मुंबईत तातडीने खड्डे बुजवणे अपेक्षित असताना खड्डे तातडीने बुजवण्यात आलेले नाहीत. यामुळे मुंबईकरांची गैरसोय झाली आहे. खड्डे योग्य प्रकारे बुजवले जात नसल्याने अपघात होत आहेत. पेव्हरब्लॉकने रस्ते बनवण्याला आम्ही विरोध केला होता, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी दिली. खड्डे बुजवताना पेव्हर ब्लॉक वापरणे ही गंभीरबाब आहे. पालिका नालेसफाई, रोड बनवणायचे काम असो कि खड्डे बुजवणे यात निष्फळ ठरली आहे. खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉक वापरल्याने अपघात होणार असून त्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. दरम्यान २४ तासात खड्डे बुजवले नाही तर त्या विरोधात काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.

रस्त्यावरील ८० टक्के खड्डे भरल्याचा दावा -
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मुंबईतील ८० टक्के खड्डे भरण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने स्थायी समितीत केला आहे. रस्त्यांवरील खड्डयांबाबत ७०३ तक्रारी पालिकेकडे आल्या. त्यामधील ५५२ खड्डे भरण्यात आले आहेत. कोल्डमिक्सचा वापर हा पावसात होत असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवले जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली.

Last Updated : Jul 12, 2019, 11:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details