मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा शंखनाद रविवारी झाला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात मागील निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हिंगोली आणि रायगड मतदार संघात तर अत्यंत चुरशीची लढत झाली होती.
हिंगोली मतदारसंघ : राजीव सातव Vs सुभाष वानखेडे
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यावेळचे आमदार राजीव सातव यांना मैदानात उतरवले होते. शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. अखेर १ हजार ६३२ मतांनी आघाडी घेत सातव यांनी विजय नोंदवला. तसेच काँग्रेसच्या पारड्यात दुसरी जागा पाडली. राजीव सातव यांना ८० हजार ९५२ (४५%) मते तर वानखेडेंना ७९ हजार ४७३ (४४.१%) मते मिळाली होती.
रायगड मतदारसंघ : अनंत गीते Vs सुनील तटकरे
मागील निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांच्यात मुख्य लढत झाली होती. त्यावेळी तटकरेंनी अनंत गीते यांना चांगलाच घाम फोडला होता. १५ लाख १३ हजार मतदारांमधून गीतेंना अवघ्या २ हजार ११० मतांनी विजय मिळवता आला होता. अनंत गीतेंना ६८ हजार १२ (३८%) मते, तर तटकरेंना ६४ हजार ३७५ (३६%) मते मिळाली होती.
माढा मतदारसंघ : विजयसिंह मोहिते पाटील Vs सदाभाऊ खोत
२०१४ मध्ये या मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. माढा मतदार संघात राष्ट्रवादीला पराभूत करणे तसे अवघड आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे (महायुती) तेव्हाचे उमेदवार सदाभाऊ खोतांनी त्यांना चांगली टक्कर दिली. मोहिते पाटिलांना २५ हजार ३४४ मताधिक्य मिळाले होते.
अकोला मतदारसंघ : तिहेरी लढत
भाजपचे संजय धोत्रे ४ लाख ५६ हजार ४७२ मते घेऊन विजयी झाले होते. काँग्रेसचे हिदायत पटेल हे २ लाख ५३ हजार ३५६ मतांसह दुसऱ्या, तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली. या मतदार संघात तिघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, दांडगा जनसंपर्क असलेल्या संजय धोत्रेंनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली.