मुंबई -सांगलीतील जतमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर खरमरीत टीका केली होती. 'राज्यपालपदी असलेल्या विक्षिप्त माणसामुळे सरकारला अडचणी येत आहेत', असे मंत्री ठाकूर म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचे आता राज्यभरात पडसाद उमटत आहेत. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळत आहे. भाजपनेते गिरीश महाजन यांनी मंत्री ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांचे समर्थन करत राज्यपालांनीदेखील राज्यघटनेचे पालन करावे, असे म्हटले आहे.
हे लोकशाहीसाठी घातक -
यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत गिरीश महाजन यांनी यशोमतींना बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला दिली आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या थरावर जाऊन बोलणे, टीका करणे अतिशय चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, अशा शब्दात भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल असतो. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. ते राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे राज्यपालांवर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अतिशय चुकीचे आहे. प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. नेत्यांनी बोलताना तारतम्य ठेवायला हवे, असा सल्लाही त्यांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे.
राज्यपालांनी देखील राज्यघटनेचे पालन करावे -
यशोमती ठाकूर यांनी राज्यपालांबाबत केलेल्या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया देत यशोमती ठाकूर यांचे समर्थन केले आहे. यशोमती ठाकूर यांच्याकडून राज्यपालांबाबत झालेले वक्तव्य चुकून झाले असेल. मात्र राज्यपालांनीदेखील राज्यघटनेचे पालन करावे. ते राज्यघटनेचे संकेत पाळत नाहीत. त्यांनी पदाचे गांभीर्य ओळखून काम केले, तर मंत्र्यांवर असे शब्द वापरण्याची वेळ येणार नाही, असा सल्लाही त्यांनी राज्यपालांना दिला आहे.
राज्यपालांबाबत असा शब्दप्रयोग करणे उचित नाही -
राज्यपालांचे पद हे संविधानिक पद असून राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. तेव्हा एखाद्या मंत्र्याने किंवा एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने राज्यपालांबाबत असा शब्द प्रयोग करणे उचित नाही. यशोमती ठाकूरांचे वक्तव्य निश्चितच निषेधार्य आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे.