मुंबई - कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर औषध, बेड मिळत नसल्याने अनेक रुग्ण तडफडून मरत आहेत. असे असताना रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राज्यात राजकारण सुरू आहे. मुळात रेमडेसिवीर किंवा इतर कोणतीही महत्त्वाची औषधे खरेदी करण्यासाठी काय नियम आहेत, त्याची मार्गदर्शन तत्वे काय आहेत याचा विचार करता रेमडेसिवीर औषध हे शेड्युल 'एच'मध्ये येते आणि ते कंपनीकडून परवानाधारक वितरकालाच (डिस्ट्रीब्युटर) खरेदी करता येते. कुठल्याही राजकीय पक्षाला, संस्थेला अशी खरेदी करता येत नाही. दरम्यान, संसर्गजन्य आजाराचा काळ लक्षात घेता पालिका, जिल्हाधिकाऱ्यांना या इंजेक्शनची खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली असून हे इंजेक्शन केवळ रुग्णालयासाठीच वापरणे बंधनकारक असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)तील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे.
कोरोनाचा विषाणु रेमडेसिवीरमुळे मरत नाही तरी मागणीत वाढ
कोरोनावर अजूनही कोणतेही औषध आलेले नाही. मात्र तरी 'ईबोला' आजारावरील रेमडेसिवीर हे इंजेक्शन गंभीर कोरोना रुग्णांना दिले जात असून त्यामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र ,काही शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय संस्थेच्या अभ्यासानुसार या इंजेक्शनचा काही उपयोग होत नाही. कोरोनाचा विषाणु रेमडेसिवीरमुळे मरत नाही. तरी डॉक्टरांकडून या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. याची मागणी सध्या खूप वाढली आहे. एकूण रुग्णांच्या 10 टक्के रुग्णांना हे इंजेक्शन लागते. अशावेळी राज्यात सहा लाखाहून अधिक रुग्ण सक्रिय आहेत. म्हणजेच आज दिवसाला 60 हजारांहून अधिक इंजेक्शनची गरज आहे. पण, सध्या इंजेक्शनची मोठी टंचाई आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरसाठी वणवण करावी लागत आहे, मनस्ताप आणि तणाव सोसावा लागत आहे. तर ऑक्सिजन आणि इंजेक्शन न मिळाल्याने रुग्ण मोठ्या संख्येने मरत आहेत, असे भयावह वास्तव राज्यात आहे.
राजकारण जोमात आरोग्य यंत्रणा कोमात
ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या कमतरतेमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोमात गेल्यासारखी आहे. मात्र, दुसरीकडे यावरून जोमात राजकारण सुरू आहे. केंद्राने राज्याला इंजेक्शन मिळू नये अशी व्यवस्था निर्माण केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. तर हे आरोप भाजपने फेटाळून लावले आहे. मात्र त्याचवेळी ब्रूक फार्मा नावाच्या एका कंपनीकडे 60 हजार इंजेक्शनचा साठा पडून असल्याची माहिती मिळाल्याने मुंबई पोलिसांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि आदी नेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत हस्तक्षेप केला. पुढे ब्रूक फार्माकडून भाजपने 60 हजार इंजेक्शन खरेदी केल्याची माहिती समोर आली. तर हे इंजेक्शन आम्ही महाराष्ट्रासाठी वापरणार असल्याचा दावा भाजपने केला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरुच असून राजकारण चांगलेच पेटले आहे.