महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Break The Chain : राज्यातील लॉकडाऊन शिथील, मात्र ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम

राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 11 जिल्ह्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे.

Relaxation in lockdown in maharashtra
राज्यातील लॉकडाऊन शिथील, मात्र ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम

By

Published : Aug 2, 2021, 7:34 PM IST

Updated : Aug 2, 2021, 8:35 PM IST

मुंबई -कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्यातील २५ जिह्यांची निर्बंधांतून मुक्तता करण्यात आली. येथील दुकाने आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर ११ जिल्ह्यांमधील रुग्ण संख्या लक्षात घेत, नियमावली कायम ठेवली आहे. सर्व सामान्यांच्या लोकल प्रवासाचा मार्ग मात्र बंद ठेवण्यात आला आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी केला असून रात्रीपासून ही नियमावली लागू होईल, असे त्यात नमूद केले आहे.

अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर -

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. रुग्ण संख्येतदेखील चढ-उतार दिसून येत आहेत. दिल्ली, कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर राज्यात लॉकडाऊन शिथील करावे, अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष आणि सर्व सामान्यांकडून केली जात होती. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांना या नियमावलीमुळे दिलासा मिळणार आहे. व्यापारी वर्गांचा रोष पाहता दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय, वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असेल. तर, रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे नियमावलीत नमूद केले आहे. उद्याने आणि मैदाने व्यायामासाठी खुली ठेवण्यास संमती दिली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयावर सोपवली आहे. याशिवाय, कार्यालये वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालविण्यास भर देण्याची सूचना नव्या नियमावलीतून केली आहे.

११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम -

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर अशा ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहतील. तर मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या संदर्भातील निर्णय घेण्याच्या सूचना आपत्कालीन विभागाला दिल्या आहेत. तसेच मुंबईकरांची जीवनवाहीनी असलेल्या लोकल सेवेला अद्याप परवागनी दिलेली नाही. राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्यासही अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंदच राहतील.

काय आहे नियमावलीत -

  • सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू
  • अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • मॉल्स व सिनेमागृहे नाट्यगृहे बंद
  • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ वाजेनंतर तसेच शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे किंवा पार्सल सेवा, घरपोच सेवा सुरु राहील
  • उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत पालिकेचे आदेश लागू राहतील
  • सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू
  • खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू
  • कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह ५० टक्के क्षमतेने सुरू
  • मैदानी खेळांसाठी सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत, तर सायंकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी
  • चित्रीकरणासाठी बुबल (Bubble) संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल
  • सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणूक ५० टक्के बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू
  • लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील
  • अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल
  • बैठका, स्थानिक संस्थांच्या, सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या व सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमता
  • बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल
  • कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील
  • ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील
  • जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील
  • व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्युटी सेंटर्स, स्पा, वेलनेस सेंटर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल
  • सार्वजनिक परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही
  • मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील
  • खासगी कार, टॅक्सी, बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी नियमितपणे परवानगी राहील
  • उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील

हेही वाचा - 12th Result : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, 'या' वेबसाईट्सवर बघा तुमचा निकाल

Last Updated : Aug 2, 2021, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details