मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहवानानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरद्वारे पद्म पारितोषिकासाठी सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांच्या नावाची शिफारस केली आहे. राऊत यांच्या या ट्वीटमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे ट्विट वादाचा नवा अध्याय -
देशाच्या प्रतिष्ठित पद्म सन्मान पुरस्कारासाठी समाजासाठी विशेष योगदान दिलेली माणसे तुम्हाला माहिती असतील तर त्यांची नावे पद्म पुरस्कारासाठी नामांकीत करावीत असे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे जनतेला केले. नामांकन देण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2021 पर्यंत ठेवली. त्यानुसार ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 'पद्म पारितोषिकासाठी नाव सुचवा, असे आवाहन पंतप्रधानांनी तमाम भारतीयांना केले आहे. मी नम्रपणे फादर स्टेन स्वामी यांचे नाव सुचवतो, विचार केला जाईल अशी आशा आहे', असे आशयाचे ट्विट करत मोदी सरकारला छेडले आहे. राऊत यांच्या ट्वीटवरून वादाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण होते फादरस्टॅनस्वामी -
फादर स्टॅन स्वामी हे झारखंडच्या आदिवासी भागात सामाजिक कार्य करीत होते. आदिवासी मुलांची शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांनी जागरुक व्हावे, त्यांना मानवाधिकार मिळावेत यासाठी त्यांचा संघर्ष होता. महाराष्ट्रातील तुरुंगातही ते कैद्यांच्या मानवाधिकारविषयी लढत होते. परंतु एल्गार परिषद, भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार, शहरी नक्षलवाद अशा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्वामींना 9 ऑक्टोबर 2020 मध्ये अटक होती. तेव्हापासून ते तुरूंगात होते. त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. स्वामी यांना पार्किन्सन्सचा आजारही होता. 6 जुलै 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने मोदी सरकारला यावेळी फटकारले होते. सोशल माध्यमातून सरकार जोरदार टीका झाली. हे प्रकरण शमत असतानाच, राऊत यांनी स्टेन यांना पारितोषिक देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - शहरी नक्षलवाद प्रकरण : 'रूग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी तुरूंगातच मरेन'