मुंबई -आधीच मंदीची झळ सोसणाऱ्या बांधकाम व्यवसायाचे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आता कंबरडेच मोडले आहे. या क्षेत्राला याचा मोठा फटका बसल्याने देशभरातील बिल्डर चिंताग्रस्त झाले होते. मात्र, आता बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण, आरबीआयने नॅशनल हाऊसिंग बँकेला 10 हजार कोटींची मदत केली असून अन्यही तरतुदी केल्या आहेत. यामुळे बांधकाम व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे म्हणत बिल्डरांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट आपल्यासोबत देशात आर्थिक संकटही घेऊन आले आहे. हे संकट येत्या काळात तीव्र होऊ नये आणि देशाला त्याचा फटका बसू नये यासाठी आरबीआयने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नॅशनल हाऊसिंग बँकेला 10 हजार कोटी, नाबार्डला 25 हजार कोटी आणि सीडबीला 15 हजार कोटी अशी एकूण 50 हजार कोटींची मदत आरबीआयने केली आहे. याचा मोठा फायदा देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या बांधकाम व्यवसायाला होणार आहे.