मुंबई - मेट्रोच्या कारशेडसाठी आरे येथील झाडे तोडली जाणार आहेत. याला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. मात्र, आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत उद्धव ठाकरे उपस्थित राहतात, हा कसला विरोध असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांमध्ये शंका उपस्थित होत असल्याने त्याचा खुलासा करावा अशी मागणीही रवी राजा यांनी केली आहे.
मुंबईत प्रदूषण कमी करण्याच्या नावावर मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मेट्रोसाठी गोरेगाव आरे येथे कारशेड उभारले जाणार आहे. या कारशेडसाठी २७०० झाडे तोडली जाणार आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विरोध असल्याने हा झाडे तोडण्याचा प्रस्ताव दोन वर्षे रखडला होता. नुकतीच या वृक्ष तोडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेनेही मेट्रो रेल कॉर्पोरेशनला झाडे तोडून त्याबदल्यात ३० दिवसात १३,११० झाडे लावण्यास सांगितले आहे. मेट्रोसाठी आरेमधील झाडे तोडण्यास मंजुरी दिल्यानंतरही शिवसेनेचा झाडे तोडण्याला विरोध असल्याचे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो कोचचे उदघाटन केले. तसेच आरे येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनाचे भूमिपूजन केले. मेट्रो भवन बांधण्यासाठीही अनेक झाडे तोडली जाणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.