मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारला. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सत्ता हातून गेली. राज्यातील सत्ता संघर्षाचा वाद न्यायालयात पोहचला. अशातच, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष, चिन्ह बहाल केले. ठाकरेंच्या शिवसेनेला यानंतर गळती लागली. नाशिक सारख्या जिल्ह्यात जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. नाशिकची पडझड रोखण्याचे काम खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आले; मात्र राऊतांच्या दौऱ्यापूर्वीच पदाधिकारी फोडून शिंदेंनी दणका देण्यास सुरुवात केली.
रश्मी ठाकरे नाशिक रोखणार?सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे, दौरे, यात्रा काढत आहेत. दोघांनीही पक्षबांधणीवर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस ठाकरे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. आता ठाण्या पाठोपाठ नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रिंगणात उतरणार आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस रश्मी ठाकरेंचा मेळावा देखील होणार आहे. आघाडीची सत्ता गेल्यानंतर ठाकरे परिवाराने राज्यात मोट बांधणीला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंनी राज्यात फिरुन धग राखली आहे. आता रश्मी ठाकरे हाती मशाल घेऊन पक्षाला प्रकाशझोतात आणणार असल्याची चर्चा रंगली आहे.