मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नवीन असे काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगाच्या संदर्भात कोणतीच ठोस तरतूद केली नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी बुडबुडा असून, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केल्याचे शेट्टी म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्प 2020: 'अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली'
आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनीही हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी बुडबुडा असल्याचे म्हटले आहे.
फक्त योजना आखून शेती सुधारत नाही. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केल्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी हा फक्त बुडबुडा असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आत्महत्या वाढत आहेत, पायाभुत सुविधांचा अभाव आहे, नवीन तंत्रज्ञान मिळत नाही, नवीन संशोधनाकडे सरकारचं दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. एकाबाजूला शेतीसाठी भरीव तरतूद केल्याचा त्यांनी फक्त गाजावाजा केल्याचे शेट्टी म्हणाले. प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटींची तर 1 लाख 23 हजार कोटी हे जलसंधारण ग्रामीण विकासासाठी केली. मात्र, देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता. ही तरतूद खूप तुटपुंजी असल्याचे म्हणत शेट्टींनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.