मुंबई Uddhav Thackeray :राजेश वानखेडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केलाय. आज मला आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतंय, पूर्वी शिवसेनेत होतो आणि आजही शिवसेनेत आहे, अशी प्रतिक्रिया राजेश वानखेडे यांनी दिली. दरम्यान, राजेश वानखेडे आपले शिवसेनेत स्वागत आहे. तुमच्यासारखे कट्टर एकवटले तर लढाई सोपी आहे, विरोधकांना पराभूत करणे सोपे जाईल, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय.
खोकेबाजाना मी स्वप्नात दिसतो : आज माझ्याजवळ काही नाही. हे गद्दार पक्ष, चिन्ह सर्व घेऊन गेलेत. अमिताभ बच्चन व शशी कपूरच्या एका सिनेमात संवाद आहे की, मेरे पास ये है, वो है, तुम्हारे पास क्या है? पण मी म्हणतो माझ्याजवळ मायाळू, प्रेमळ शिवसैनिक आहेत. यांचे प्रेम आणि माया तुम्हाला कुठेही विकत घेता येत नाही. आज आमच्याकडे सत्ता नाहीय. तरीसुद्धा खोकेबाजांना उठता-बसता स्वप्नात फक्त उद्धव ठाकरे दिसत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केलीय.
22 जानेवारीला काळाराम मंदिरात प्रवेश : एकिकडे 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. येथे मंदिर व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती आणि याचसाठी केला होता अट्टाहास. शिवसेनेचे आणि शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते, अयोध्येत श्री राम मंदिर व्हावे. राम हा सगळ्यांचा आहे आणि आता तिथे राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. आम्हा सर्वांना आनंद आहे. नाशिकमधील काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं. आपण देखील 22 जानेवारीला काळाराम मंदिरात दर्शनासाठी जातोय आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये सभा घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी जाहीर केलंय.
13 जानेवारीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा : आता जे बाहेर भटकंतीसाठी गेले आहेत, त्यांना आता शिवसेनेत प्रवेश नाही. तसेच, मी 13 तारखेला कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी शाखेत जाऊन संवाद साधणार आहे. यावेळी भाषण नाही करणार. पण कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शाखेत कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. येथील मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.