मुंबई- कोरोनाबाधित रुग्ण सध्या बरे होण्याच्या वाटेवर आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्व धर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासोबतच गुढी पाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा -कोरोना निदान तपासणीचे भारतामध्ये पहिले किट तयार; पुण्यातील कंपनीला आले यश
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनता आणि माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला. आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आतापर्यंत १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे १५ रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. ही समाधानाची बाब आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र, अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या, त्यांना अडवू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. बाधीत रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने राहा आणि माणुसकी सोडू नका, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.