महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरेंनी पत्रातून मनसैनिकांना दिला धीर - राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र

नांदेडचे मनसेचे शहराध्यक्ष सुनिल इरावार यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून आत्महत्या केली. त्यानंतर राज ठाकरेंनी इरावार यांच्या कुटुंबीयांचे फोन करून सांत्वन केले, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिम्मत देण्यासाठी एक पत्र लिहिले आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : Aug 18, 2020, 12:00 PM IST

मुंबई- नांदेडचे मनसेचे शहराध्यक्ष सुनिल इरावार यांनी जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणे यापुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा. असे पत्र लिहून आपल्या जीवनाचा शेवट केला. त्यानंतर मनसे सैनिकांना धीर देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहिर पत्राच्या माध्यमातून संवाद साधला आहे. तसेच आत्महत्या केलेल्या सुनिल इरावार यांच्या परिवाराचे राज ठाकरे यांनी फोनवरून सांत्वन केले.

राज ठाकरे पत्रात लिहितात, संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं, अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण आपल्याला बदलायचं आहे, म्हणूनच 9 मार्च 2006 ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरू केला. नवनिर्माणाच्या आपल्या या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले 14 वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते. पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही, असे राज सांगतात.

पुढे ते म्हणतात, मी याआधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा, त्या मतदारसंघात अमुक जातीची इतकी मतं आहेत या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे. असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही. मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही. यश जेव्हा यायचं असेल तेव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल, अशी भावनिक ताकीद राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना दिली आहे.

सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details