मुंबई -पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडल्यानंतर आता येथील निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. येथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. ममतांच्या या विजयानंतर आता देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरवर ममता बॅनर्जी यांच्या बरोबर काढलेलेल्या जुना फोटो ट्विट करत ममता बॅनर्जी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जीचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवले. कलासक्तवृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल याच्यात खूप समानता आहे. त्याचसोबत राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठी आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल, अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन असे ट्वीट राज यांनी केले आहे.