मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे होर्डिंग्ज दिसत आहेत. राज ठाकरे हे 'राज' या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचे खरे नाव 'स्वराज' ठाकरे आहे. त्यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला होता. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे उत्तम संगीतकार, पत्रकार, व्यंगचित्रकार होते.
बाळासाहेबांचा वारसा : त्यामुळे साहजिकच राज ठाकरेंनाही हा वारसा मिळाला आहे. श्रीकांत ठाकरे यांचे बंधू शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे देखील उत्तम व्यंगचित्रकार होते. श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांना वडील केशव ठाकरे यांच्याकडून वारसा मिळाला आहे. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात असल्याने राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रे, राजकीय नेतृत्वगुण फुलले.
राज ठाकरेंचे आवाहन :12 जून रोजी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, चाहत्यांना एक खास आवाहन ट्विटच्या माध्यमातून केले आहे. 'दरवर्षी 14 जून रोजी माझ्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कार्यकर्ते मला भेटायला येतात, मला शुभेच्छा देतात. तुमचे अभिवादन ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. काही कार्यकर्ते पुष्पगुच्छ, मिठाई, भेटवस्तू घेऊन येतात. मात्र, या वर्षापासून मी तुम्हाला नम्र विनंती करतो की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. त्याऐवजी, एखादे रोपटे किंवा शैक्षणिक साहित्या गिफ्ट' देण्याची विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. तुम्ही दिलेली रोपटी आम्ही विविध संस्थांना वृक्ष लागवडीसाठी देऊ. तुम्ही जे काही शैक्षणिक साहित्य भेट म्हणून आणाल ते आम्ही गरजू विद्यार्थ्यांना भेट देऊ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.