मुंबई - हार्बर मार्गावरील अत्याधुनिक रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा केली आहे. मात्र, पुलाची व्यवस्था असूनही प्रवासी राजरोसपणे जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे रूळ ओलांडण्याचा हा शॉर्टकट मार्ग जीवघेणा ठरू शकतो, याकडे प्रवासी दुर्लक्ष करत आहेत.
नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट
नवी मुंबईतील हार्बर रेल्वेची बेलापूर, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैराणे, घणसोली, रबाळे, ऐरोली ही महत्त्वाची रेल्वे स्थानकं आहेत. या रेल्वे स्थानकांवरून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने लोकल रेल्वे धावत असतात. दररोज हजारो प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी असते.
हेही वाचा - एकाच ट्रॅकवर डेक्कन रेल्वे आणि लोकल ट्रेन एकापाठोपाठ थांबल्या!
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही स्थानकात वरून तर काही ठिकाणी भूमिगत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांची आवश्यक सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवासी बिनधास्त व राजरोसपणे जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. यामध्ये विद्यार्थ्यी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे.
यापूर्वीही अनेकदा रूळ ओलांडताना अपघात झालेले आहेत. त्यानंतरही प्रवासी आपला जीव धोक्यात घालत आहेत. लोकल येत असल्याचे ध्वनिक्षेपकांवरून सूचनाही देण्यात येतात, तरीही विद्यार्थी व काही नागरिक रूळ ओलांडून पलीकडे जात असल्याचे चित्र बेलापूर स्थानकात दिसले. मात्र, या ठिकाणी रेल्वे पोलीस उपस्थित नसल्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.