मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन 3 फेब्रुवारी 1925 ला हार्बर मार्गावरील तत्कालीन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला दरम्यान चालली. सुरुवातीला मुंबई विभागात 1500 व्होल्ट डीसीवर विद्युतीकरण करून त्यावर रेल्वे सेवा सुरू होती. 2001 मध्ये डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शन करण्याचे काम सुरू होऊन 2016 मध्ये ते काम पूर्ण झाले. 2019 मध्ये मुंबई विभागत 555.5 किमी मार्ग विद्युतीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे वार्षिक 1.64 लाख टन कार्बन फूटप्रिंटची बचत होत आहे. मुंबई विभागातील 100 टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक 556.56 कोटी रुपयांची बचत होते.
पुणे विभागात 246 कोटींची बचत :पहिली इलेक्ट्रिक ट्रेन डेक्कन क्वीन 1 जून 1930 रोजी मुंबई ते पुणे दरम्यान धावली. सुरुवातीला पुणे विभागाचे विद्युतीकरण 1500 व्होल्ट डीसीवर करण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर 2004 मध्ये सुरू झाले आणि ते 2008 - 09 मध्ये पूर्ण झाले. आतापर्यंत पुणे विभागात 531 किमी मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे. यामुळे पुणे विभागाच्या इंधन बिलात लक्षणीय घट झाली आहे. जे प्रति महिना सरासरी 2303.04 किलो लिटर आहे. ज्यामुळे वार्षिक 0.733 लाख टन कार्बन फूटप्रिंट कमी करते. पुणे विभागातील 100 टक्के विद्युतीकरणामुळे वार्षिक 246 कोटी रुपयांची बचत होत आहे.