मुंबई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज रामनवमी निमित्ताने वडाळा येथील राम मंदिरात कार्यकर्त्यांसह दर्शन घेऊन दुसऱ्या टप्प्यातील प्रचारास सुरुवात केली.
राहुल शेवाळेंनी वडाळ्यातील राम मंदिरात केला विजयाचा संकल्प
भाजप व शिवसेनेकडून वारंवार राम मंदिराचा प्रश्न उपस्थित होत असताना योगायोगाने या लोकसभा निवडणुकीआधी रामनवमी आली. त्या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईचे खासदार तसेच महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी अयोध्येत राम मंदिर तर होणारच, असा विश्वास व्यक्त करत वडाळा मंदिरात दर्शन घेत विजयाचा संकल्प केला.
रामनवमी निमित्ताने आज घेतलेल्या दर्शनात शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी विजयाचा व चांगली कामे करणार असा संकल्प केला. परंतु, त्यांनी व शिवसेनेने सत्तेत आल्यावर अयोध्येतल्या राममंदिराचा प्रश्न सोडवणार आहात याचे आश्वासन पाळा म्हणजे झाले, अशी रामभक्तांनी मागणी केली.
राहुल शेवाळे या दर्शनानंतर प्रचारासाठी बाईक आणि रिक्षा रॅली मानखुर्द गाव (मानखुर्द पूर्व स्टेशनजवळ) येथून सुरू करणार आहेत. त्यांच्या सोबत प्रचारासाठी शिवेसना नेत्या श्रध्दा जाधव, यामिनी शेवाळे इतर युतीचे पदाधिकारी असणार आहेत. दर्शनादरम्यान राहुल शेवाळे यांना या निवडणुकीत कोण वनवास भोगणार? असे विचारले असता, गत ६० वर्षांपासून काँग्रेसच्या सरकारमध्ये जनता वनवासच भोगत होती. गेल्या ५ वर्षांपासून जनता वनवासातून मुक्त झाल्याचे ते म्हणाले. आता यापुढे कोण वनवास भोगेल ते लवकरच कळेल, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना लगावला .