मुंबई Rahul Narvekar :आमदार अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज (१३ ऑक्टोबर) चांगलंच झापलं. या प्रकरणी अद्यापही कारवाई होत नसेल तर आम्हाला नाईलाजानं २ महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील, असं सरन्यायाधीश म्हणाले.
आदित्य ठाकरेंची टीका :आता या प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 'महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष (राहुल नार्वेकर) आता स्पीकर राहिलेले नाहीत. त्यांनी मोकळेपणानं व निष्पक्षपणे काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. सभापती राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ', असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला. तसेच न्यायालयानं व्यक्त केलेली नाराजी येत्या काळात जनताही व्यक्त करेल, असं ते म्हणाले.
राहुल नार्वेकरांचं खोचक उत्तर : आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला राहुल नार्वेकर यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं. 'मी बिनबुडाच्या आरोपांवर भाष्य करणं महत्त्वाचं मानत नाही', असं ते म्हणाले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांवरही नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'मी विधीमंडळाचे नियम आणि संविधानाच्या तरतुदींशी कोणतीही तडजोड न करता निर्णय घेईन. मला संविधानानं स्थापन केलेल्या कुठल्याही संस्थेच्या आदेशाचा अपमान करायचा नाही. माझ्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठल्याही प्रकारे अनादर होणार नाही', असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल : ते पुढे बोलताना म्हणाले की, 'विधीमंडळ आणि विधानभवनाचं सार्वभौमत्व राखणं हे माझं कर्तव्य आहे. मी निवडणूक चिन्ह समोर घेऊन निर्णय देत नाही. तसं केलं तर ते चूक ठरेल. मी कोर्टाच्या आदेशांचं पालन करुनच योग्य काय तो निर्णय घेईन', असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईवर ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं नार्वेकरांना खडेबोल सुनावले. यानंतर राहुल नार्वेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा :
- SC Hearing on MLA : आमदार अपात्रता प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टानं झापलं, म्हणाले कोर्टाच्या निकालाची बूज राखायला विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगा