मुंबई Rahul Narvekar on MLA Disqualification Result :राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा होत सतानाच आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी यावर भूमिका मांडली आहे. हा निकाल कायद्याला धरुनच दिला जाईल, असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
निकाल कायद्याला धरुन : संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर राहूल नार्वेकर म्हणाले, "निकाल हा आजच दिला जाईल. हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरुन असेल. संविधानातील तरतुदींसह कायद्यांचं पालन केलं जाईल. सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या आदेशामध्ये काही प्रिन्सिपल सेट केले आहेत. त्या आधारावरच हा निर्णय असेल. या निर्णयातून सर्वांना न्याय भेटेल. या निर्णयातून शेड्युल 10 मध्ये काही बाबींचे इंटरप्रिटीशन आतापर्यंत झालं नव्हतं. त्यातून निश्चितपणे हा अत्यंत मूलभूत व बेंचमार्क असा निर्णय असेल. या निर्णयात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, इतकं आपणाला आश्वासित करतो. निकाल देताना कायद्याचं तंतोतंत पालन केलं जाईल."
संजय राऊत यांना स्वस्त पब्लिसिटी हवी :शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निकाल प्रक्रियेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलीय. यावर नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, "संजय राऊत उद्या म्हणतील का हा निकाल अमेरिकेतून आणलाय. हा निकाल लंडनवरुन आणलाय. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? त्यांना स्वस्त पब्लिसिटी पाहिजे आहे. त्यांच्या बोलण्यावर उत्तर देऊन त्याला वाव देण्यासारखं आहे. त्याकरिता राऊत यांच्यासारख्या लोकांना नजर अंदाज केलेलं बरं आहे."
उद्धव ठाकरेंना टोला : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावर बोलताना न्यायाधीशांनी आरोपीची भेट घेतल्याची टीका त्यांनी केली होती. यावर नार्वेकरांनी त्यांना मंगळवारी बोलताना जोरदार टोला लगावला. जी व्यक्ती माजी मुख्यमंत्री राहिली आहे, त्यांना विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय? त्यांच्यावर कुठल्या जबाबदाऱ्या असतात? त्यांना काय काम करावं लागतं? मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांची महिन्यातील पंधरा दिवसांमध्ये बैठक होत असते. अनेक विषय असतात. याबाबत माहिती असायला हवी होती. परंतु, ते मुख्यमंत्री असताना त्यांना याबाबतची माहिती मिळवण्यासाठी वेळ भेटला नसेल. म्हणून याबाबत मी अधिक काय बोलू शकतो? असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांना लगावलाय.
हेही वाचा :
- आमदार अपात्रतेच्या निकालानंतर थेट होणार जागावाटपात परिणाम, कोणाचे पारडे होणार जड?
- विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी देणं चुकीचं, आमदार अपात्रता सुनावणीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचं मत
- काही तासांत येणार शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल; निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष