मुंबईRhul Narvekar Delhi visit -शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणी राजकीय वातावरण तापलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं तंबी दिल्यानंतरही राहुल नार्वेकर हे याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्ली गाठली आहे.
कायदेशीर सल्ला घेण्यासाठी रवाना-दिल्लीत राहुल नार्वेकर हे महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. आमदार अपात्रतेबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच राहुल नार्वेकर यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नवीन वेळापत्रक सादर करताना नवीन वेळापत्रकात काय बदल करायचे यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राहुल नार्वेकर हे दिल्लीला गेले आहेत.
महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट- दिल्लीला रवाना होण्यापूर्वी राहुल नार्वेकरांनी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान ते म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणी दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची मी भेट घेणार आहे. त्याचप्रमाणे हा माझा पूर्वनियोजित दौरा असून आमदार अपात्रता प्रकरणी नवीन वेळापत्रकामध्ये जो काही बदल करायचा आहे, त्याबाबत कायदेशीर सल्ला घ्यायची गरज आहे. त्याप्रमाणे तो सल्ला मी घेईन व लवकरच निर्णय देईन. तसेच राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनाही नोटीस पाठवली आहे. ही अपात्रतेची प्रक्रिया असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
आता वेळकाढूपणा चालणार नाही- राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसापूर्वी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. या प्रकरणांमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून वेळकाढूपणा काढत आहेत, असा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने होत आहे. अशातच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा याप्रकरणी दोन वेळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कठोर शब्दात फटकारले आहे. जर तुम्ही ठोस निर्णय घेणार नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, अशी सरन्यायाधीशांना तंबी दिली होती. आमदारांच्या अपात्रतेसदंर्भात याचिका ही निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्यक्षांसमोर आहे, अशा कडक शब्दात सरन्यायाधीशांनी फटकारल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष याबाबत योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.
वेळापत्रकाची माहिती न्यायालयात द्यावी लागणार- यापूर्वी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी तयार केलेल्या वेळापत्रकावरून सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे वाढले होते. त्यानंतर अध्यक्षांना आता उद्या या सुनावणीबाबत सविस्तर माहिती कोर्टाला द्यावी लागेल. त्याचबरोबर या सुनावणीचे नवीन वेळापत्रकही सादर करावे लागणार आहे. हे सर्व झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-
- MLA Disqualification Case : याचिका सहा गटात एकत्रित करुन सुनावणी होणार- विधानसभा अध्यक्ष
- Uddhav Thackeray Dasara Melava : 'निर्लज्ज सदासुखी' असा खेळ सुरू; आमदार अपात्र मुद्द्यावरुन ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा